दुसऱ्यांदाही प्रेमात अपयश आल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’लाच त्याने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:56 PM2021-02-17T12:56:06+5:302021-02-17T12:56:50+5:30
शिवशंकर कॉलनीत पेट्रोल ओतून जाळून आत्महत्या करणारा तरुण सिल्लोडचा
औरंगाबाद : शिवशंकर कॉलनीत ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या (दि.१४ फेब्रुवारी) मध्यरात्री पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या करणाऱ्या अनोळखी तरुणाची ओळख त्याच्या हातावरील टॅटूमुळे पटली.आकाश दिलीप इंगळे (२२, रा. सिल्लोड), असे त्याचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याच्या कथित प्रेयसीचे नावही पोलिसांना प्राप्त झाले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आकाश हा आई-वडिलांसोबत सिल्लोड येथे राहतो. तो बी.एस्सी. प्रथम वर्षात शिकत होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक, तर आई गृहिणी आहे. त्याला तीन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. आकाश लाडात वाढल्यामुळे तो मनासारखे जगत होता. त्याचे सिल्लोड येथील एका मुलीवर प्रथम प्रेम होते. त्याने तिचे अश्विनी नाव स्वतःच्या हातावर गोंदून घेतले होते. काहीतरी कारणामुळे त्याचा प्रेमभंग झाला. पहिलीसोबत ताटातूट झाल्यावर त्याचे औरंगाबाद शहरातील एका तरुणीसोबत प्रेम जुळले. त्याने आणि त्याच्या मित्राने एका हातावर स्वतःचे नाव आणि दुसऱ्या हातावर दिल आणि ईसीजीचा टॅटू काढला होता. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील ) मुकुंदवाडीतील शिवाजीनगरात राहतात. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आदल्या दिवशी तो आणि त्याची आई आजोबाकडे आले होते. ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिला भेटायचे त्याने ठरविले होते. आकाशची प्रेयसीसोबत काहीतरी कारणावरून कुरबूर झाली होती. तो तिला भेटण्यासाठी शिवशंकर कॉलनीत गेला. मात्र, ती त्याला भेटली नाही. यामुळे नैराश्येतून त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर आली.
‘लोकमत’ वाचून आकाशच्या बहिणीने केला पोलिसांना फोन
आकाश १४ जानेवारी रोजी सायंकाळी आजोबाच्या घरून बाहेर पडला तेव्हा त्याने त्याचा अँड्राॅइड फोन घरीच ठेवला होता. यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. मंगळवारी सकाळी ‘लोकमत’मध्ये या घटनेचे वृत्त प्रकाशित झाले. यातील मृताचे वर्णन वाचून आकाशच्या बहिणीने पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना मृताच्या हातावरील टॅटू दाखविला आणि अंगावरील कपडे आणि चप्पल दाखविल्यावर तिने हंबरडा फोडला. वडिलांनीही आकाश त्यांचीच चप्पल वापरत असल्याचे सांगून अश्रूला वाट मोकळी करून दिली.