‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:57 AM2019-01-12T00:57:22+5:302019-01-12T00:57:41+5:30
सावंगी जि.प. शाळा : विद्यार्थी मारहाण प्रकरण भोवले
लासूर स्टेशन : येथील ग्रामविकास अधिका-याला सावंगी येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करणे चांगलीच महागात पडली असून, त्यांच्या विरोधात विनापरवानगी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण करून शिक्षा केल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
३ जानेवारी रोजी घडलेल्या या प्रकरणात तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कारवाई करण्यात आली. लासूर स्टेशन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी ३ जानेवारी रोजी सावंगी येथील जि.प. शाळेत विनापरवानगी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले होते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देता आली नाही म्हणून गव्हाणे यांनी त्यांना मारहाण करून शिक्षा केली होती. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. मुख्याध्यापक नारायण कोकरे यांनी या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गव्हाणे यांच्या विरोधात शिल्लेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गंगापूरचे गटविकास अधिकारी विद्याधर पाटील, विस्तार अधिकारी डी. वाय. दुधे व शाखाधिकारी साहेबराव पाटील यांच्या पथकाने शाळेत येऊन चौकशी केली होती. त्यात ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी विनापरवानगी हा प्रकार केल्याचा अहवाल दिला. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी सांगितले.