नशेत ७५ हजारांची बॅग विसरला अन् दारुडा चोरीची फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:24 PM2021-01-13T13:24:42+5:302021-01-13T13:28:22+5:30
दारुडा करमाड येथील एका हॉटेलमध्ये मद्य पीत बसला होता
औरंगाबाद : करमाड येथे दारूच्या नशेत ७५ हजारांची बॅग विसरल्यानंतर तो चक्क बॅग चोरी झाल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. पुंडलिकनगर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचा बनाव उघड झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की , सचिन बबन म्हस्के (रा. सावरगाव म्हस्के, ता. जाफराबाद) हा मंगळवारी दुपारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आला आणि त्याची ७५ हजारांची बॅग सिडको एन ३ मधील उद्यानातून चोरी झाल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याने त्याचा मोबाइल सपोनि घनश्याम सोनवणे याच्या हातात देऊन बोलायला सांगितले. समोरच्या व्यक्तीने म्हस्केची तक्रार घ्या, असे सुनावले आणि फोन कट केला. सोनवणे यांनी अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून तक्रारीची खात्री करण्यास सांगितले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात म्हस्केजवळ बॅग नव्हती असे दिसून आले.
यामुळे पोलिसांनी त्याचा घटनाक्रम जाणून घेतला तेव्हा त्याने करमाड येथील एका हॉटेलमध्ये मद्य पीत बसला होता असे त्याने सांगितले. तेथेच त्याची बॅग विसरल्याच्या संशयाने पोलिसांनी हॉटेलचालकाला फोन करून बॅगविषयी विचारणा केली असता तेथे एक बॅग असल्याचे त्याने सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी ती बॅग मिळवून म्हस्के याला दिली.