त्यांना 'हार्ट अटॅक'ची लक्षणं होती; संजय शिरसाट यांच्या मुलीनं दिली तब्येतीची सविस्तर माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:03 AM2022-10-18T10:03:24+5:302022-10-18T10:50:13+5:30
सिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सोमवारी दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिमचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी त्यांना एअर अम्बुलन्सने मुंबईला नेण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असून रक्तदाब वाढल्याची माहिती त्यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सोमवारी दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची यापूर्वीची अँजिओप्लास्टी मुंबईत झालेली आहे. त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
कालपासून रक्तदाब वाढला होता, त्यामुळे सिग्मा रुग्णालयात ते अंडर ऑब्जरवेशन होते. मात्र, ही हार्ट अटॅकची लक्षणे होती म्हणून आज अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आल्याचे हर्षदा शिरसाट यांनी सांगितले. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात डॉ पारकर आणि डॉ नितीन गोखले यांच्या निगराणीखाली उपचार होणार आहेत. दरम्यान, संजय शिरसाट हे विमानतळावर चालत गेले, त्यामुळे इतर हार्ट अटॅकच्या चर्चा निरर्थक आहेत.