कपाशी विक्रीचे दोन लाख रुपये घरी घेऊन जाताना हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:32 AM2020-12-17T04:32:49+5:302020-12-17T04:32:49+5:30
सोयगाव : शेतात वर्षभर राबराब राबून पिकविलेल्या कपाशीची दोन लाख रुपयांची रक्कम घरी घेऊन जाताना ती रक्कम रस्त्यातच हरवल्याची ...
सोयगाव : शेतात वर्षभर राबराब राबून पिकविलेल्या कपाशीची दोन लाख रुपयांची रक्कम घरी घेऊन जाताना ती रक्कम रस्त्यातच हरवल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव (हरे) ते बहुलखेडादरम्यान घडली. बहुलखेडा येथील शेतकरी महंमद शरीफ देशमुख व राजमल पवार या दोन्ही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला कपाशी विक्री करून विक्रीपोटी मिळालेले दोन लाख रुपये घेऊन मोटारसायकलवर गावी निघाले. पिंपळगाव (हरे, ता. पाचोरा) येथून घरी येत असताना अचानक पैशांची पिशवी हातातून पडली, याचे भान त्यांना राहिले नाही. घरी येताच पैशाची पिशवी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असता या शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काळ्या मातीत पिकविलेली कपाशी विक्री करून कष्टाची कमाई घरी आणताच रस्त्यातच हरवल्याने ते हतबल झाले आहेत. रात्रभर शोधाशोध केली; पण रक्कम मिळाली नाही.