दारू पिण्यास चाळीस रुपये न दिल्याने त्याने पत्नीचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 AM2021-07-07T04:04:36+5:302021-07-07T04:04:36+5:30
जायकवाडी : दारू पिण्यासाठी चाळीस रुपये न दिल्याने पतीने त्याच्या पत्नीस गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील ...
जायकवाडी : दारू पिण्यासाठी चाळीस रुपये न दिल्याने पतीने त्याच्या पत्नीस गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील बालानगर येथे उघडकीस आली आहे. २८ जून रोजी ही घटना घडल्यानंतर पत्नीचा आजाराने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगून त्याने दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारही करण्यात आले; परंतु मयत महिलेच्या मुलाने हा प्रकार आजीला सांगितल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून जावयावर पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मीनाबाई ढोकळे (३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, कैलास ढोकळे (३९) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालानगर येथील कैलास दत्तु ढोकळे याने सोमवार, २८ जून रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास पत्नी मीनाबाईकडे दारू पिण्यासाठी चाळीस रुपयांची मागणी केली. त्यावर तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कैलासने पत्नीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत तिचा गळा दाबून खून केला. याबाबत घरात असलेल्या दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना गप्प राहण्याचे सांगितले. मुलांनीदेखील भीतीपोटी तोंड उघडले नाही. गावकरी व नातेवाइकांना आजारपणाने पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २९ जून रोजी गावकऱ्यांच्या उपस्थितीत मीनाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
---
आजोळी गेल्यावर मुलांनी फोडला टाहो
खून होऊन सहा दिवस उलटले होते. कोणालाही कानोखबर न लागल्याने कैलास ढोकळे मोकाट फिरत होता. दोन्ही मुलांनाही कैलासने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते शांत होते. दरम्यान, शनिवार ३ जुलै रोजी दोन्ही मुले आपल्या आजोळी विहामांडवा येथे गेले. त्यानंतर त्यांनी टाहो फोडत वडिलांनीच आईचा जीव घेतल्याचे आजीला सांगितले. या घटनेने आजोळकडील सर्वांना धक्काच बसला. मयत मीना यांच्या आई इंदूबाई धोंडीराम गुंजाळ (५५, रा. विहामांडवा) यांनी एमआयडीसी पैठण पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून मयत मुलीचा पती तथा त्यांचा जावई कैलास दत्तू ढोकळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अर्चना पाटील, राजू जावळे, विजय मोरे करीत आहेत.
--
फोटो :