'तो' पट्टेदार वाघ गौताळ्यात रमलाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:04 AM2021-04-28T04:04:27+5:302021-04-28T04:04:27+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, उमरखेड, माहूर, अकोला, हिंगोली, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, लोणार, अजिंठा, सोयगाव असा सुमारे २४० कि.मी.चा प्रवास ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, उमरखेड, माहूर, अकोला, हिंगोली, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, लोणार, अजिंठा, सोयगाव असा सुमारे २४० कि.मी.चा प्रवास करीत पट्टेदार वाघ फेब्रुवारीत गौताळा अभयारण्यात दाखल झाला. वन विभागाने गौताळा अभयारण्यात पाच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. पैकी एका कॅमेऱ्यात १५ मार्च रोजी तो टिपला गेल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी दिली. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ टिपला जात आहे.
डॉ. पाठक यांच्यासह वन्यजीवप्रेमी मिलिंद गिरधारी, वसीम कादरी तसेच वनसेवक रमेश घुगे यांनी रविवारी वाघाच्या शोधार्थ मोहीम राबविली. जामदरा, चंदन नाला, गौतम ऋषी आश्रम परिसर, सीता न्हाणी या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा, विष्ठा आढळून आली. जामदरा येथे वाघाने शिकार केलेली मृत नीलगाय सुध्दा आढळून आली.
अडीच महिन्यांपासून रमला..
विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विजय सातपुते म्हणाले की, वाघ ८-१० दिवसाला वेगवेगळ्या भागात फिरतो. गौताळ्यात पोषक वातावरण दिसल्याने तो अडीच महिन्यांपासून येथे रमला आहे. गौताळ्यात नीलगाय, रानडुकरे मोठ्या प्रमाणात आहे. लपण्यासाठी गवत आहे. गेल्या वर्षी ४५ आणि यावर्षी ७० पाणवठे तयार केल्याने पाण्याची उपलब्धता आहे. मोठ्या प्रमाणात शिकार मिळते. हे समृद्ध जंगल असल्याने वाघाला सुरक्षित वाटले असावे.