स्वतःच भोसकून घेत लुटल्याचा केला बनाव; गुन्हे शाखेने केला प्रकरणाचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:46 PM2022-12-09T12:46:26+5:302022-12-09T12:47:11+5:30
बनाव असल्याचे २४ तासांत गुन्हे शाखेने केला उघड
औरंगाबाद : दोन लुटारूंनी उचलून नेत पैसे न दिल्यामुळे चाकूने भोसकून पाचशे रुपये लुटल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. त्यातील फिर्यादीनेच स्वत:वर चाकूने वार करून लुटल्याचा बनाव केल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. जयप्रकाश राधाकृष्ण परदेशी (५७, रा. बनेवाडी) असे बनाव करणाऱ्याचे नाव आहे.
जयप्रकाश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते पाटबंधारे विभागातील चाळीसगाव येथे चौकीदार आहेत. ते बनेवाडी येथील नातेवाईकांकडे आले होते. ७ डिसेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी पायी जात असताना अयोध्यानगरी गणपती मंदिराच्या पाठीमागे काही अंतरावर दोन लुटारूंनी त्यांना अडविले. लुटारूंनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यांनी पैशांची मागणी केली. परदेशी यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी उचलून जंगलात नेले. त्याठिकाणी एकाने हात धरून दुसऱ्याने पोटात व गळ्याजवळ चाकूने वार केले. त्यांच्या खिशातील पाचशे रुपये घेऊन पोबारा केल्याचे म्हटले होते. छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
बनाव असल्याचे २४ तासांत उघड
तपास अधिकारी सपोनि. पांडुरंग भागिले यांच्यासह उपनिरीक्षक पुंडलिक डाके, गणेश केदार यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वेळेत तफावत आढळल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच वेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सपोनि. मनोज शिंदे, उपनिरीक्षक रमाकांत पटारे, हवालदार संतोष सोनवणे, भगवान शिलोटे, नितीन देशमुख, गीता ढाकणे यांनीही तपासचक्रे फिरविली. घटनेच्या वेळी परदेशी रेल्वे स्टेशन चौकातील सीसीटीव्हीत दिसत होता. खोलात गेल्यावर परदेशीनेच स्वत:वर चाकूने हल्ला करून घेतल्याचे वास्तव समोर आले.
परदेशी कर्जबाजारी
परदेशी यांना दोन अपत्ये असून, मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा वर्षभरापूर्वी पुरात वाहून गेला तेव्हापासून ते आणि पत्नी सतत दु:खात राहायचे. काहीसा बदल म्हणून नातेवाईकांनी त्यांना औरंगाबादला आणले होते. त्यांच्यावर १२ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे देणेकऱ्यांनीही तगादा लावल्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.