उधारी वसुलीसाठी त्याने चक्क आइस्क्रीमचा ट्रक पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 05:39 PM2018-04-27T17:39:30+5:302018-04-27T17:40:59+5:30
ग्लो साईन बोर्डची आॅर्डर देणाऱ्या आइस्क्रीम कंपनीकडील उधारी वसूल करण्यासाठी चक्क कंपनीची ९१ हजार रुपये किमतीची आइस्क्रीम वाहनचालकाचा विश्वासघात करून उतरून घेणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : ग्लो साईन बोर्डची आॅर्डर देणाऱ्या आइस्क्रीम कंपनीकडील उधारी वसूल करण्यासाठी चक्क कंपनीची ९१ हजार रुपये किमतीची आइस्क्रीम वाहनचालकाचा विश्वासघात करून उतरून घेणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. आरोपीने लांबविलेल्या आइस्क्रीमचा साठाही पोलिसांनी जप्त केला.
शेख सर्फराज असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबईतील एका आइस्क्रीम कंपनीने अहमदनगर आणि औरंगाबाद शहरातील काही दुकानदारांच्या मागणीप्रमाणे दीड लाख रुपये किमतीचे आइस्क्रीमचे १८७ कॅरेट एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कोल्ड फ्रीज वाहनातून पाठविली होती.
या वाहनाचा चालक रोहित यादव (रा. भिवंडी, ठाणे) याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका दुकानदाराला ३३ कॅरेट दिले. उर्वरित मालासह तो २२ एप्रिल रोजी औरंगाबादेत आला. त्यावेळी आरोपीने यादव यांना फोन करून तू आणलेल्या मालाची आॅर्डर मीच दिली आहे, असे म्हणाला. त्यानंतर तो जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीसमोर येऊन यादवला भेटला. आरोपी आइस्क्रीमच्या वाहनात बसला आणि तेथून तो यादवला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथील एका खोलीत त्याला झोपण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी सर्फराज आणि त्याच्या मित्राने यादवच्या टेम्पोतील सुमारे ९१ हजार रुपयांची आइस्क्रीम चिकलठाणा येथील जुन्या वळण रस्त्यावरील आइस्क्रीम कंपनीत उतरविली आणि रिकामा टेम्पो परत आणून दिला. त्यातील मालाविषयी यादवने विचारले असता आइस्क्रीम कंपनीकडून आपली ६० ते ७० हजारांची येणी आहे. तीही रक्कम वसूल करण्यासाठी आपण हा माल उतरविल्याचे म्हणाला. ही बाब यादवने त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला फोन करून कळविली. त्यानंतर कंपनीच्या आदेशानुसार यादवने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदविली.
जीपीएसची झाली मदत
ट्रान्सपोर्ट कंपनीने त्यांच्या टेम्पोला जीपीएस यंत्रणा बसविलेली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आरोपीने टेम्पो कोणत्या मार्गाने नेला आणि कोठून परत आणला, याबाबतचा सर्व मार्ग जीपीएसमुळे मिळाला. जीपीएसचा लाभ पोलिसांना झाला.