स्वच्छ पाण्यासाठी ‘त्याने’ विहिरीतच खाट लटकावून सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:04 AM2021-02-25T04:04:56+5:302021-02-25T04:04:56+5:30

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ...

He started his fast by hanging a bed in the well for clean water | स्वच्छ पाण्यासाठी ‘त्याने’ विहिरीतच खाट लटकावून सुरू केले उपोषण

स्वच्छ पाण्यासाठी ‘त्याने’ विहिरीतच खाट लटकावून सुरू केले उपोषण

googlenewsNext

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असून, विहिरीतील दूषित पाणी काढून गावकऱ्यांना भरावे लागत आहे. गावाला शुद्ध पाणी का मिळत नाही, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील एका तरुणाने विहिरीत खाट लटकावून त्यावर उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनाची मात्र, तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती.

गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या कार्यालयाबाहेर आणून पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून मंगेश साबळेविरुद्ध कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा साबळे याने ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी (दि.२४) सकाळपासून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ज्या विहिरीतून गावाला पाणी मिळते त्याच विहिरीत खाट लटकून शुद्ध पाणी द्या, अशी मागणी केली आहे.

गेवराई पायगा गावाला स्वच्छ पाणी का मिळत नाही, विहिरीतून महिला, वृद्धांना शेंदून (काढून) पाणी भरावे लागते. या विहिरीच्या पाण्यामुळे चहा खराब होतो. बालकांना घसादुखीचा त्रास होतो. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न मंगेश साबळे याने केला आहे. याबाबत सरपंच पती दिलीप जैस्वाल व ग्रामसेवकांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतमधील जबाबदार व्यक्तींनीदेखील या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

----

गेवराई पायगा येथील तरुण मंगेश साबळे याने गावाला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे म्हणून विहिरीतच उपोषण सुरू केले ही माहिती मिळाली. तेव्हा मी विस्तार अधिकारी यांना तत्काळ गेवराईत पाठविले आहे. त्यांचा अहवाल येताच योग्य ते सांगता येईल, असे फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके व गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर गावविकासापासून कोसोे दूर

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरदेखील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावात पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही, ही मोठी शर्मेची बाब ठरू शकते. गावात अजूनही नळ योजनेचे जाळे विणले गेले नाही. त्याचबरोबर रस्त्यांचीदेखील दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे गावातील समस्या सुटतील का, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील का, असे प्रश्न गावकऱ्यांतून केले जात आहेत.

Web Title: He started his fast by hanging a bed in the well for clean water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.