दुसऱ्याच्या कार स्वतःच्या असल्याची थाप मारून १२ लाखांना फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 06:39 PM2020-12-12T18:39:05+5:302020-12-12T18:40:54+5:30
आरोपीने दोन कारची छायाचित्रे व्हॉटस्ॲपवर पाठविली.
औरंगाबाद : दुसऱ्याच्या मालकीच्या दोन कार स्वतःच्या असल्याची थाप मारून नाशिकच्या एकाने औरंगाबादमधील दोन जणांची १२ लाख १५ हजारांत कार विक्री करून फसवणूक केल्याची घटना समोर आली. हा प्रकार समोर येताच आरोपीविरुद्ध सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
सय्यद रफिक (रा. नाशिक), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहम्मद जाहेद कुरेशी आणि त्याचे मामेभाऊ शफिक खान यांना कार खरेदी करायच्या होत्या. आरोपीकडे कार विक्रीसाठी असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता आरोपीने त्याच्या स्वतःच्या दोन कार विक्रीसाठी असल्याची थाप मारली. एवढेच नव्हे, तर आरोपीने दोन कारची छायाचित्रे व्हॉटस्ॲपवर पाठविली. या कार तक्रारदार यांना पसंत आल्याने त्यांनी कार खरेदीचा निर्णय घेतला.
आरोपीने त्याच्या मुलाच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात रक्कम पाठविण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी ११ लाख ८० हजार रुपये अमजद सय्यद रफिकच्या बँक खात्यात जमा केले. ही रक्कम जमा केल्यावर आरोपीने सांगितल्यानुसार ३५ हजार रुपये पेटीएमद्वारे पाठवून दिले. एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतर आरोपीनी तक्रारदार यांना त्या दोन्ही कार दिल्या नाहीत. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तक्रारदार यांना संशय आल्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने व्हॉटस्ॲपवर पाठविलेल्या छायाचित्रामधील कार दुसऱ्याच्या मालकीच्या असल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांनी लगेच सिटीचौक ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली.
व्हॉटस्ॲपवर पाठविली कारची छायाचित्रे
आरोपीने तक्रारदार यांच्या व्हॉट्सॲपवर कारची छायाचित्रे पाठवून त्या दोन्ही कार त्याच्या असल्याचे सांगितले. या दोन्ही कार आवडल्याने तक्रारदार यांनी त्या खरेदी करण्यासाठी आरोपीसोबत सौदा केला.