२५ हजारांची लाच घेताना आरोग्यसेविकेस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:18 AM2018-12-13T00:18:30+5:302018-12-13T00:18:46+5:30
कारवाई : नोकरी लावून देण्याचे आमिष महागात पडले
सिल्लोड : आरोग्य विभागात माझे ओळखीचे अधिकारी असून त्यांना सांगून आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देते, असे सांगून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवानी येथील आरोग्य सेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिल्लोड येथील पंचायत समिती आवारात उर्वरित रकमेपैकी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोग्य सेविकेचे नाव सुनीता किसन चंडोल (३९) असून त्या बोरगाव सारवानी आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आहेत. त्यांनी एका जणास नोकरीचे आमिष दाखवून यापूर्वीच ५ लाख रुपयाची मागणी करून ४ लाख ७० हजार रुपये घेतले होते. आता पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर सदर प्र्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पं.स. आवारात सापळा रचून मंगळवारी सुनीता चंडोल यांना २५ हजाराची लाच घेताच रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोहेकॉ. गणेश पंडुरे, विजय बाम्हंदे, पोना. रवींद्र अंबेकर, पोशि. सुनील पाटील, मपोशि. निर्मला सुपारे यांनी केली. आरोपी सुनीता किसन चंडोलविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दोन दिवसात दुसरी कारवाई
तालुक्यातील रहिमाबाद येथील महिला तलाठी दीपाली जाधव यांना जमिनीची फेरफार नोंद रजिष्टरला घेण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेताना सोमवारी पकडले होते. या घटनेला दोन दिवस होत नाही तर मंगळवारी आरोग्य सेविका लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.