‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य
By प्रभुदास पाटोळे | Published: May 22, 2024 10:49 AM2024-05-22T10:49:21+5:302024-05-22T10:50:11+5:30
दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले.
प्रभुदास पाटोळे -
छत्रपती संभाजीनगर : दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले. गुजरातेतील सुरतच्या ‘डोनेट लाइफ’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झालेल्या अवयवदानामुळे दोघांनाही मतदानाचा मौलिक अधिकार पुन्हा मिळाला, अशी माहिती या संस्थेचे संस्थापक तथा दक्षिण गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष नीलेशभाई मांडलेवाला यांनी भ्रमणध्वनीद्वारे खास ‘लोकमत’ला दिली.
विजेच्या धक्क्यामुळे गमावले होते दोन्ही हात
प्रकाश यांना विजेच्या धक्क्यामुळे हात व पाय गमावले. अजयभाई काकडीया या १४ वर्षांच्या मुलाच्या अवयवदानातून प्रकाश यांना ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन्ही हात मिळाले.
विजेच्या धक्क्यामुळे अनिता यांना दोन्ही हात गमवावे लागले. त्यांची मुले लहान होती. त्यांना सुरतचे ६७ वर्षांचे कनूभाई गारियाधार यांच्या अवयवदानामुळे ट्रान्सप्लांटद्वारे दोन्ही हात मिळाले.