तिकीटही मागितले नव्हते त्याला उमेदवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून काँग्रेस पुन्हा हद्दपारच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 03:28 PM2024-11-24T15:28:59+5:302024-11-24T15:29:46+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसने आपण कमकुवत आहोत, यावर शिक्कामोर्तब करून ठेवले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातून काँग्रेस पुन्हा हद्दपार झाली. मागच्या विधानसभा निवडणुकीतही नऊपैकी एकही आमदार कॉँग्रेसचा नव्हता. यावेळीही तेच घडले. मुळात तिकीट वाटपातच कॉँग्रेसच्या पदरी निराशा पडली होती. औरंगाबाद पूर्वमध्ये कॉँग्रेसतर्फे उमेदवार देण्यात आला. पण त्या उमेदवाराचे सोशल इंजिनिअरिंग काहीच कामाचे ठरले नाही.
जिल्ह्यात काँग्रेसने आपण कमकुवत आहोत, यावर शिक्कामोर्तब करून ठेवले. मागच्या विधानसभा निवडणुकीतही पूर्वमधून काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळाला नव्हता. यावेळीही निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांची राजकारणातील जोरदार एंट्री आणि त्याबरोबरच त्यांना पूर्वची जाहीर झालेली उमेदवारी ही बाब खळबळजनक ठरली. याचा आनंद मिळायच्या आतच सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली देशमुख यांची उमेदवारी बदलण्यात आली व ती लहुजी शेवाळे यांना जाहीर करण्यात आली. ही बाबही खळबळजनक ठरली.
तिकीटही मागितले नव्हते...
वस्तुत: लहुजी शेवाळे यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीटही मागितले नव्हते. पण तिकीट मागणाऱ्यांना बाजूल सारून ते शेवाळे यांना जाहीर करण्यात आले. ते सुरुवातीपासूनच कमजोर ठरत गेले. किंबहुना त्यांच्यासाठी जशी यंत्रणा राबवावयास हवी होती, तशी राबवली गेलीच नाही. त्यामुळे त्यांना ही निवडणूक एकाकी लढवावी लागली. त्यांच्या उमेदवारीची कुणालाच भीती वाटली नाही.
वातावरण कॅश करून घेण्यात पडले कमी.....
डॉ. कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर फुलंब्रीच्या जागेवर काँग्रेसचे विलासबापू औताडे यांचा दावा प्रबळ बनला होता. इतर अनेक अपक्षांचा विचार न करता औताडे यांना उमेदवारीही मिळाली. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल बनून गेल्यानंतर व भाजपमधल्याच इच्छुकांची नाराजी लक्षात घेतल्यानंतर तसेच शिंदे गटाचे रमेश पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांना फुलंब्री जड जाईल, असे वाटत होते. पण हे वातावरण कॅश करण्यात विलासबापू औताडे कमी पडले. आणि त्यांचा तब्बल ३२ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे फुलंब्रीतूनही काँग्रेस हद्दपार झाली. जिल्ह्यातल्या अन्य कुठल्याच मतदारसंघांत काँग्रेसची स्थिती मजबूत नाही. नजीकच्या काळात जेव्हा केव्हा महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील, तेव्हा कॉँग्रेसचे काय होईल, ही चिंता आहेच.