ज्याला शरीर सांभाळता येईल, त्यालाच देव मिळेल: निवृत्ती महाराज इंदोरीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:48 PM2022-11-22T17:48:43+5:302022-11-22T17:49:18+5:30
ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर : राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त हरिकीर्तन, हजारोंकडून अभीष्टचिंतन
औरंगाबाद : कोरोनाच्या तीन लाटांतून वाचलो म्हणून आपण खरे भाग्यवान आहोत...अहो, पैसा कामी येत नाही, सत्ता कामी येत नाही... हे कोरोनाने शिकविले.. आता भ्रमात राहू नका...क्वारंटाईन झाल्यावर घरचेही जवळ येत नाहीत... ज्याला शरीराला सांभाळता येईल, त्यालाच देव मिळेल... ८० टक्के लोक हृदयविकाराने मरतात... कारण एकच; तणाव. यासाठी तणावमुक्त जगा, शरीर सांभाळा, असे आवाहन लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले आणि उपस्थितांनी यास होकार देत समर्थन केले.
प्रसंग होता लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ७० व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सोमवारी रात्री आयोजित हरिकीर्तनाचा... कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची एवढी प्रचंड गर्दी केली होती की, कारगिल मैदान अपुरे पडले. फटाक्यांच्या आतषबाजीत इंदोरीकर महाराजांचे आगमन झाले. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र दर्डा, लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. सहकार मंत्री अतुल सावे यांनीही हजेरी लावली होती. प्रारंभी आयोजक बबन डिडोरे पाटील व विशाल डिडोरे पाटील यांनी इंदोरीकर महाराजांचा सत्कार केला. सायली डिडोरे यांनी महाराजांचे औक्षण केले.
‘रूप पाहता लोचनी’ व ‘ आपुला तो एक देव करूनी घ्यावा’ या दोन अभंगांनी महाराजांनी सुरुवात केली. महाराज म्हणाले की, आज अपघाताने लोक जास्त मरतात. त्याची तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे दारू पिऊन वाहन चालविणे, दुसरे अतिवेगात चालविणे व तिसरे चालवताना मोबाइलवर बोलणे... मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही दारू सोडा, असे कळकळीचे आवाहन महाराजांनी केले. मोबाइलमुळे काय तोटे होत आहेत, हे महाराजांनी विविध उदाहरणे देत व लहान मुलांना बोलते करत विनोदी ढंगातून मांडले. सोशल मीडियामुळे लोक वेडे झाले आहेत. अनेक गंभीर विषय विनोदी ढंगात सादर करीत सर्वांना आरसा दाखविला. रात्रीचे १० कधी वाजले, हे कोणाला कळलेही नाही. कीर्तन सुरू होण्याआधी ह.भ.प. प्रभाकर महाराज कुंटे यांनी भारूड सादर केले.
शंभर वर्षे जगा- महाराजांचा आशीर्वाद
इंदोरीकर महाराज यांनी सांगितले की, आज राजेंद्र दर्डा यांचा ७० वा वाढदिवस आहे. मात्र, त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही की, ते ७० वर्षांचे झाले. (हंशा) त्याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली. त्यांच्या प्रेमापायी आयोजक बबनराव डिडोरे २४ वर्षांपासून माझे हरिकीर्तन ठेवत आहेत. दर्डा यांचा १०० वा वाढदिवस आपण साजरा करू, त्यावेळीसही माझेच कीर्तन असेल व आयोजक डिडोरेच असतील; असा आशीर्वाद महाराजांनी देताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत अभीष्टचिंतन केले.
अंगणात तुळस लावा नसता...
इंदोरीकर महाराज म्हणाले की, महिलांनी घराच्या अंगणात तुळस लावावी. कारण, तुळसच ऑक्सिजन देते. कोरोना काळात ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून हजारो लोक मरण पावले. राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक घर एक झाड’ लावण्याचा सर्वांनी संकल्प करावा. सोपान महाराज सानप, माधव महाराज पितरवाड, पोपट महाराज फरकाडे, श्रीकांत शेळके, संतोष साळुंके, काशीनाथ महाराज, अजय डिडोरे, साहेबराव म्हस्के, विजय दिसागज, राजाराम मोरे, दीपक पवार, अशोक बादल, रमेश दिसागज, बाळासाहेब हरबक आदींंनी हा कीर्तन सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
‘बहारो फूल बरसाओ’ आणि वन्समोअर
निवृत्ती देशमुख महाराजांचे कीर्तन म्हणजे समाजातल्या व्यंगांवर बोट ठेवण, त्यावर प्रबोधन करण. हल्ली लग्नामध्ये काही वाईट प्रथा शिरल्या आहेत, यावर सर्वांचे लक्ष वेधले. त्याचे विविध उदाहरण देत असताना, नवरदेव लग्नमंडपात येतो तेव्हा ‘बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है’ हे गीत म्हटले जाते. ते गीत इंदोरीकर महाराजांनी आपल्या ढंगात गात व त्याच वेळी मद्यपी नवरदेवाची नकल करीत पोट धरून हसविले... या गाण्याला उपस्थितांनी ‘वन्समोअर’ मिळाले...