प्रमुख कारागीर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:17 AM2017-10-30T00:17:18+5:302017-10-30T00:17:23+5:30
औरंगाबाद-पुणे मार्गावर ब्रेकशिवाय एसटी धावल्याप्रकरणी प्रमुख कारागिरास निलंबित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे मार्गावर ब्रेकशिवाय एसटी धावल्याप्रकरणी प्रमुख कारागिरास निलंबित करण्यात आले आहे. चौकशीमध्ये प्राथमिकदृष्ट्या प्रमुख कारागीर या घटनेला जबाबदार असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी सांगितले.
औरंगाबाद-पुणे ही हिरकणी बस २१ आॅक्टोबरला औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानाकातून रात्री ११.४५ वाजता पुण्याकडे निघाली. गंभीर गोष्ट अशी की, ही गाडी डेपोमध्ये दुरुस्तीसाठी उभी होती. तिच्या ब्रेकचे काम अर्धवट असतानाच ही गाडी चालकास देण्यात आली. पुढच्या दोन्ही चाकांच्या ब्रेकमध्ये ‘कॅचर’ नावाचा भाग नव्हता. याविषयी २४ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त दिले.
नादुरुस्त गाडीच ड्यूटीवर गेल्याचे जेव्हा प्रमुख कारागिराला कळाले तेव्हा एकच गोंधळ उडाला. त्यांनी घाईघाईने चालकाला फोन करून गाडी जेथे असेल तेथे थांबविण्याचे आदेश दिले. तोपर्यंत रात्रीचे १.३० वाजलेले होते आणि गाडी घोडेगावच्या पुढे पोहोचलेली होती. चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. काही तासांनंतर आगारातून रिकामी बस पाठविण्यात आली व प्रवाशांना तिच्यामध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून प्रमुख कारागिराला निलंबित करण्यात आले. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे धनाड यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी दोघांवर कारवाई होणार आहे. प्रमुख कारागिरांवर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे. खालच्या कर्मचा-यांनी योग्य काम केले का नाही, हे पाहण्याची जबाबदारी प्रमुख कारागिराची असते. त्यामुळे कारवाई झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.