शिक्षिकेवरील कारवाई टाळण्यासाठी लाच स्विकारताना केंद्रप्रमुख जाळ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 07:55 PM2019-03-19T19:55:49+5:302019-03-19T19:56:22+5:30
या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कन्नड (औरंगाबाद ) : कन्नड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शिक्षिकेला देण्यात आलेल्या मेमो नुसार कारवाई टाळण्यासाठी लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रप्रमुखाला रंगेहात पकडले. मंगळवारी (दि. १९) दुपारी झालेल्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील औराळा केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास शेलार यांच्याकडे विटा , औराळा, जेहूर व चापानेर केंद्रांचा कार्यभार आहे. पिडीत शिक्षिका जि.प. खामगाव येथील द्विशिक्षकी शाळेत आहे. दोन्ही शिक्षक शाळेत न आल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावून गट शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार केली. तक्रारीनुसार केंद्रप्रमुख रामदास स. शेलार ( ५५ ) यांनी चौकशी करून अहवाल दाखल केल्यानंतर संबंधित शिक्षकांना मेमो देण्यात आले.
यामेमो नुसार कारवाई न करण्यासाठी पंचासमक्ष दि. १४ मार्च २०१९ रोजी २ हजार ५०० रु. ची मागणी करुन २ हजार रुपयावर तडजोड करण्यात आली. ही रक्कम आज दुपारी स्विकारतांना केंद्र प्रमुख रामदास शेलार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी,अपर पोलिस एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी कुंभार, पोना. रविंद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, गणेश पंडूरेे, पोशि. संदीप चिंचोले यांनी ही कारवाई केली.