आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयसक्ती
By Admin | Published: March 16, 2016 11:59 PM2016-03-16T23:59:34+5:302016-03-17T00:04:06+5:30
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी ऐकायला मिळाल्या.
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांनी ग्रामसेवक व आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयसक्ती केली आहे.
डॉक्टर मुख्यालयी राहात नसल्याची मोठी तक्रार कायम गावपातळीवर असते. शिवाय येणाऱ्या तक्रारींतही हा ओघ असतो. त्यातच ग्रामसेवक तर गावात फिरकतही नसल्याच्या तक्रारी जागोजाग ऐकायला मिळाल्या. एकापेक्षा जास्त सज्जे असल्याने दुसऱ्या गावांची नावे सांगून ग्रामसेवक वेळ मारून नेत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. त्यातच औंढा तालुक्यातील तुर्कपिंप्रीत तर गंभीर तक्रारी होत्या. त्यामुळे सीईओंनी आता एकापेक्षा जास्त सज्जे असलेल्या ग्रामसेवकांसाठी वेळापत्रकच तयार करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिला. या वेळापत्रकावर सीईओ आर्दड यांच्या स्वाक्षरीने अंमलबजावणी होणार आहे. ठरवून दिलेल्या वाराला दिलेल्या वेळेत संबंधित ग्रामसेवक त्या गावात न आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी तपासण्या होणार आहेत. या अधिकाऱ्यांनीही किती तपासण्या कराव्यात, याचे बंधन घालण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने आरोग्य विभागातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींनी ही तपासणी करायची आहे. याशिवाय अधून-मधून खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दौऱ्यावर जावून तपासणी करणार आहेत. यामध्ये कसूर केल्यास थेट कारवाईचे हत्यावर उपसले जाणार आहे.