आरोग्य केंद्रे ‘रामभरोसे’!

By Admin | Published: November 13, 2014 12:27 AM2014-11-13T00:27:48+5:302014-11-13T00:53:10+5:30

संजय तिपाले , बीड डॉक्टरसारखं गळ्यात ‘स्टेथॅस्कोप’ घालून मिरवायची गरज नाही की, पुस्तकं चाळत बसण्याची आवश्यकता नाही़ कुठल्या आजाराला कुठली गोळी द्यायची?

Health centers 'Ram Bharose'! | आरोग्य केंद्रे ‘रामभरोसे’!

आरोग्य केंद्रे ‘रामभरोसे’!

googlenewsNext


संजय तिपाले , बीड
डॉक्टरसारखं गळ्यात ‘स्टेथॅस्कोप’ घालून मिरवायची गरज नाही की, पुस्तकं चाळत बसण्याची आवश्यकता नाही़ कुठल्या आजाराला कुठली गोळी द्यायची? हे कळलं तरी पुरेसं़़़! जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचारी सध्या अशाच पद्धतीने डॉक्टरांची ‘डिक्टो’ भूमिका साकारत आहेत़ साथरोगांवर उपचार अन् तेही ‘फुकट’ मिळतायतं ना मग त्यातच समाधान मानायचं अन् गप गोळ्या गिळत रहायचं़़़!! असे ‘डोस’ पाजायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘दांडी’यात्रेने आरोग्यकेंद्रांत कर्मचारीच ‘कारभारी’ बनले आहेत़ त्यामुळे सामान्यांच्या नशिबी प्रतीक्षा, हेळसांड अन् डोकेदुखीचा ‘ताप’ कायम आहे़ ‘लोकमत’ने बुधवारी एकाचवेळी १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘स्टींग’ केले तेंव्हा ही धक्कादायक बाब समोर आली़
‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे़ त्यात आता थोडी सुधारणा करुन ‘उपचार नको, पण हेळसांड आवर’ असे म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे़ जिल्ह्यात साथरोगांनी हातपाय पसरलेले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र याचे कुठले गांभिर्यच राहिलेले नाही, असे विदारक चित्र आहे़ डॉक्टरांच्या प्रतीक्षेत आरोग्य केंद्रांच्या दारात ताटकळलेले रुग्ण़़़ कुठे कर्मचाऱ्यांमार्फतच रेवड्या, फुटाण्यांप्रमाणे सुरु असलेले गोळ्या- औषधांचे वाटप़़़ तर कुठे आरोग्यकेंद्रांना चक्क टाळे़़़ अशा खळबळजनक बाबी आढळून आल्या़ जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आरोग्य केंद्रांवरच इलाज करण्याची आवश्यकता आहे़ लोकप्रतिनिधींपासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांनीच ‘चोवीस तास’ वैद्यकीय सुविधा देण्याचे फर्मान सोडले; परंतु या आदेशाला रजा, मिटींग, दौरा़़़ अशा ‘पळ’वाटा शोधून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धुडकावले आहे़ दुष्काळाचे ढग घोंगावत असतानाच साथरोगांचा उद्रेक वाढला आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने मिळायला हव्यात; परंतु, महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणारे वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रांमधील खुर्चीत टेकायलाच तयार नाहीत़ त्यामुळे ‘ना’ईलाजाने रुग्णांना खासगी दवाखान्यांची पायरी चढून खिसा रिता करावा लागण्याचे आणखी एक दुखणं वाढलं आहे़
कोठे काय आढळले?
असे केले स्टींग़़़!
‘लोकमत’ प्रतिनिधींनी जिल्ह्यातील ५० पैकी १३ आरोग्य केंद्रांमध्ये एकाचवेळी स्टींग आॅपरेशन केले़ आरोग्य केंद्रांमधील त्या- त्या वेळची स्थिती पाहिली़ काही केंद्रांमध्ये प्रतिनिधी रुग्ण बनूनच गेले़ बहुतांश केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी नव्हते़ कंत्राटी आरोग्यसेविकांनीच गोळ्या- औषधी हातावर टेकवून उपचाराचा सोपस्कार पूर्ण केला़
सकाळी स्टींग, दुपारी रजा!
नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रज्ञा तरकसे यांना ‘लोकमत’ प्रतिनिधींनी स्टींग केल्याची कुणकुण लागताच त्यांनी दुपारी रजेचा अर्ज जि़प़ आरोग्य विभागात दिला़ बैठक तसेच औषधी आणण्यासाठी त्या गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते़ मात्र, डॉ़ तरकसे यांनी रजा घेतली़ त्यांनी इतक्या घाईने रजा कशी काय टाकली? असा सवाल उपस्थित होत आहे़
१९ पैकी केवळ पाच जण हजर
नवगण राजूरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘लोकमत’ने स्टींग केले तेंव्हा केवळ पाचच कर्मचारी उपस्थित होते़ या केंद्रात १९ कर्मचारी कार्यरत आहेत़ वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रज्ञा तरकसे या तर नव्हत्याच; परंतु एक फार्मसिस्ट, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक आरोग्यसेविका, एका आरोग्य सहायक व एक शिपाई असा मोजकाच स्टाफ उपस्थित होता़
पर्यवेक्षक दौऱ्यावर, शिपाई पाण्याला!
राजूरी केंद्रातील इतकर कर्मचारी कोठे आहेत? असे विचारल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला़ पर्यवेक्षक गावांना भेटी देण्यासाठी गेल्याचे सांगितले गेले़ शिपाई पाणी आणण्यासाठी पाठविला असून चालक इथेच कोठेतरी रेंगाळत असेल असे उत्तर मिळाले़ मात्र, हजेरी रजिस्टरला त्या सर्वांच्या दोन दिवासांपासूनच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या़
कधीही या अन् कधीही जा़़़!
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी स्वतंत्र रजिस्टर असते़ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी मात्र, असे रजिस्टर नाही़ त्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यासाठी ‘थंब इम्प्रेशन’ची सुविधाही अद्याप विकसित झालेली नाही़ त्यामुळे डॉक्टर कधी आले? कधी गेले? याची नोंदच होत नाही़ कर्मचारी देखील मिटींग, दौरा, रजा अशी कारणे देत डॉक्टरांविरुद्ध बोलायला धजावत नाहीत़
नवगण राजूरी प्राथमिक आरोग्यकेंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत़ डॉ़ प्रज्ञा तरकसे व डॉ़ एस़ बी़ शिंदे यांचा समावेश आहे़ पैकी, डॉ़ शिंदे सहा महिन्यांपूर्वी रुजू झाले़ महिनाभर काम करुन नंतर ते उच्च शिक्षणासाठी पगारी रजेवर गेले़ डॉ़ फरिदा शेख यांची तेथे तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली हाती;पण त्या देखील मूळ ठिकाणी रुजू झाल्या़ त्यामुळे आता डॉ़ तरकसे यांच्याकडेच जबाबदारी आली आहे़ या केंद्रांतर्गत ३० गावांचा समावेश आहे़ मात्र, त्यासाठी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी आहेत़ साथरोगांचे थैमान असताना देखील अशी स्थिती आहे़
असा झाला संवाद़़़!
स्थळ: नवगण राजुरी
वेळ: सकाळी ११: ४५
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘लोकमत’ प्रतिनिधी सकाळी ११: ४५ वाजता धडकले़ जुन्या इमारतीला लागूनच नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे़ जुन्या इमारतीसमोर एक शासकीय जीप उभी होती़ केवळ दोनच रुग्ण होते़ आठ खाटांच्या या रुग्णालयात बाकावर एका रुग्णावर उपचार सुरू होते तर बाह्यरुग्ण विभागात एक रुग्ण होता़
प्रतिनिधी: (डोक्याला हात लावत) ताप आला आहे, डॉक्टर आहेत का?
कर्मचारी: डॉक्टर नाहीत़ हाताने खुणावत इकडे जा़़़ औषधी गोळ्या घ्या़
प्रतिनिधी: डॉक्टर कोठे आहेत?
कर्मचारी: मॅडम, मिटींगला गेल्या आहेत़ तुम्ही जा तिकडे़़़!
प्रतिनिधी: (तपासणी कक्षाच्या बाहेर प्रतीक्षा करत उभा)
कर्मचारी : या, काय झालयं?
प्रतिनिधी: ताप आला आहे़़़!
कर्मचारी : (सहा गोळ्या पुढे सरकवत ह्या गोळ्या घ्या, दोन टाईम जेवणानंतऱ
प्रतिनिधी: ताप कधी कमी होईल? अन् फक्त गोळ्याच़़़!
कर्मचारी: डॉक्टर नाहीत़ आता फक्त गोळ्याच घेऊन जा़
प्रतिनिधी: पण डॉक्टर आहेत कुठे?
कर्मचारी: त्या, औषधी आणायला बीडला गेल्या आहेत़
प्रतिनिधी: त्या स्वत: जातात औषधी आणण्यासाठी?
कर्मचारी: हो़ पण तुम्ही कशासाठी विचारताय?

Web Title: Health centers 'Ram Bharose'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.