दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:04 AM2021-06-04T04:04:37+5:302021-06-04T04:04:37+5:30
औरंगाबाद : सिडको एन- ६, जी सेक्टरसह मथुरानगर व संभाजी काॅलनी परिसरात नळाला दूषित पाणी येत ...
औरंगाबाद : सिडको एन- ६, जी सेक्टरसह मथुरानगर व संभाजी काॅलनी परिसरात नळाला दूषित पाणी येत असल्याची समस्या ताजी असताना पुन्हा याच भागातील गल्ली नंबर १०, ११ व पुढे संपूर्ण गल्ल्यांना दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील ड्रेनेजलाइन व पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन सोबतच आहेत. ड्रेनेजलाइन वारंवार तुंबत असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पाइपलाइनमध्ये जाते व तेच नळाला येत असल्याने परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ड्रेनेजलाइनला लागून असलेली पाण्याची पाइपलाइन मनपाने दुसरीकडे स्थलांतरीत करावी किंवा जुनाट झालेली ड्रेनेजलाइन बदलावी. मोडकळीस आलेले चेंबर नवीन बसवावे. यासंदर्भात नागरिकांनी वार्ड अधिकाऱ्यांकडे मागणी केली. त्यानुसार त्यांनी फक्त पाहणी केली. त्यानंतर ही समस्या कायम आहे. शहराला सहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. त्यातही दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर महापालिकेने पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाइपलाइन दुसरीकडे हटविण्याचे काम लवकरात लवकर करावे आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे तसेच स्थानिक नागरिक रवि गिरी, नितिन वेताळ, रोहन निकाळजे, संदीप चादुळकर, गिरीश देशपांडे, सचिन मिसाळ आदींनी दिला आहे.