औरंगाबादेत कचऱ्याच्या धुराने दम्याच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:16 PM2018-05-02T17:16:36+5:302018-05-02T17:18:10+5:30
शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.
औरंगाबाद : अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.
दम्याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन साजरा करण्यात येतो. यंदा १ मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. ‘प्रत्येक श्वासाबरोबर दम्याला दूर करूया,’ असे यंदाचे घोषवाक्य आहे. दमा (अस्थमा) हा श्वसननलिकेचा आजार आहे. हा आजार सहा महिन्यांच्या बालकापासून ते ६० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांमध्येही आढळतो. जास्त काळ खोकला येणे, छातीत खफ होणे, श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे ही काही लक्षणे आहेत. थंड हवामान, वायू प्रदूषण, धूम्रपान अथवा धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात येणे, धूळ, धुराची अॅलर्जी, अनुवंशिकता, लठ्ठपणा अशी काही दमा होण्याची कारणे आहेत. या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
रुग्णालयात वाढली गर्दी
शहरात गेले काही दिवस प्रत्येक भागामध्ये दिवस-रात्र कचरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे प्रदूषणात तर भर पडली; परंतु सोबतच दम्याच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली. कचराकोंडीपूर्वी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि कचराक ोंडीनंतरची संख्या पाहता त्यात दीडपटीने वाढ झाल्याचे दमा विकारतज्ज्ञांनी सांगितले.
कचऱ्याचा परिणाम
विविध कारणांसह कायम वायू प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्याने दमा होतो. कचरा जाळण्यामुळे गेले काही दिवस दम्याच्या रुग्णांत दीडपटीने वाढ झाली. आजारासंदर्भात वेळीच खबरदारी घेणे आवश्यक ठरते.
- डॉ. सुहास बर्दापूरकर
जनजागृतीची गरज
दम्याच्या आजाराविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये, यासाठी लहान मुलांचे वेळच्या वेळी लसीकरण करणे, धूम्रपान न करणे, रात्री जागरण न करणे यासह अनेक प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.
- डॉ. बालाजी बिरादार