आरोग्य अधिकाऱ्यांची सावध ‘रिॲक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:00+5:302021-01-19T04:07:00+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्यात आले होते. यातील चौघांना रिॲक्शन झाल्याचे ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्यात आले होते. यातील चौघांना रिॲक्शन झाल्याचे सोमवारी समोर आले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सावध पवित्रा घेत रिॲक्शन ही सामान्य बाब असून, गेल्या दोन दिवसांत त्रास जाणवलेले सर्व ठणठणीत असल्याचा दावा केला. नव्याने कोणाला रिॲक्शन झाली नसल्याचेही सांगण्यात आले.
घाटीतील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्यात आली. लस घेतलेल्या चौघांनी ताप, अशक्तपणा जाणवत असल्याची तक्रार केली. परंतु कोणालाही गंभीर स्वरुपातील रिॲक्शन नसून उपचारासाठी दाखल करण्याचीही वेळ आली नाही, असे मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर जिल्ह्यात तब्बल ४७ जणांना रिॲक्शन झाल्याचे रविवारी समोर आले. यात ग्रामीण भागातील ३० आणि शहरातील १७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काहींना उपचारासाठी दाखल करून सलाईन लावण्याची वेळही आली. या प्रकाराची राज्य स्तरावर गांभीर्याने नोंद घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रकृतींचा आढावा घेण्यात आला. परंतु कोणालाही गंभीर स्वरुपातील रिॲक्शन नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, किरकोळ स्वरुपात रिॲक्शन येतच असते. आतापर्यंत रिॲक्शन आलेल्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. नव्याने कोणाला त्रास झाल्याचे आढळले नाही.
प्रतिकार शक्ती निर्माण होते
लसीकरणानंतर काही प्रमाणात रिॲक्शनही येत असते. ही रिॲक्शन म्हणजे प्रतिकार शक्ती निर्माण होत असल्याचे संकेत असते. लस ॲक्टिव्ह असल्याचेही ते लक्षण असते.
- डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक