पर्यटनाच्या राजधानीचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:59 PM2018-07-13T23:59:15+5:302018-07-14T00:00:38+5:30
शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.
दुसरीकडे, घाटीत ‘आरएल’ यासारखी आवश्यक औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.
दूषित पाण्याचा वापर व अनेक ठिकाणी कचरा तसाच पडलेला असल्याने याचाही नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. विविध ठिकाणी साचलेल्या कचºयावर डास, माशा बसतात. त्याच माशा उघड्यावर विक्री केल्या जाणाºया हातगाड्यावरील खाद्यपदार्थांवर बसतात. यातून संसर्ग होऊन हे अन्न दूषित होते. तसेच या गाड्यांवर काम करणाºया व्यक्तींचे हात स्वच्छ नसणे हेही एक कारण यामागे असून, या अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही गॅस्ट्रोची लागण होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी जलस्रोत दूषित होत आहेत. याचाही फटका नागरिकांना बसत आहे. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोसारखा संसर्गजन्य आजार जडतो. जुलाब, उलटी होणे यातूनच रुग्णाला अशक्तपणा येतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडिसीन बिल्डिंगच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गॅस्ट्रोची लागण झालेले ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. त्यातच या वॉर्डामध्ये अत्यावश्यक असलेली औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे.
१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मागील पाच महिन्यांमध्ये शहरात जिकडे तिकडे २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेने आतापर्यंत अनेक प्रयोग करून पाहिले. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मनपाला यश आले नाही. कचराकोंडीमुळे शहरात पर्यटकांची संख्याही झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणाºया मशीन खरेदी करण्यात मग्न आहे.
गॅस्ट्रोची लागण होण्याची कारणे....
दूषित अन्न, दूषित पाणी, माशा, अस्वच्छ हातांद्वारे या संसर्गजन्य आजाराची लागण होते. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच बाहेरचे पाणी शक्यतो पिऊ नये, असा सल्ला डॉक्टारांनी दिला आहे.
सध्या घाटी रुग्णालयात विविध औषधींचा तुटवडा आहे. औषधी खरेदीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात ती मान्य झाल्यास औषधी उपलब्ध करून दिली जाईल.
- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.