आरोग्य सेवाच ‘आजारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:40 PM2019-04-06T23:40:53+5:302019-04-06T23:41:54+5:30
आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत.
(जागतिक आरोग्य दिन विशेष)
औरंगाबाद : आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत. कारण आरोग्य सेवाच सध्या ‘आजारी’ आहे. आरोग्याप्रती नागरिकांत जागरुकता वाढली. मात्र, शासकीय रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा या दिनाचे घोषवाक्य ‘सर्वांसाठी आरोग्य : प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी’ हे आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३ उपजिल्हा रुग्णालये, ११ ग्रामीण रुग्णालये, औरंगाबादेत मिनी घाटी म्हणजे चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. शहरात महापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. छावणी रुग्णालय आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. आरोग्य सेवेचे एवढे मोठे जाळे आहे. परंतु या सर्वांना अपुरा निधी, अपुºया सोयी-सुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत असून, उपचारासाठी इकडून तिकडे जाण्याची नामुष्की ओढावत आहे. या सगळ्यात खाजगी रुग्णालयांचा विस्तार झपाट्याने होत आहे.
ग्रामीण रुग्णांना सरळ रेफर
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, रुग्णालयांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे सरळ शहरात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत प्रसूतीसाठी ४० टक्क्यांवर गरोदर माता या ग्रामीण भागांतून येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात २२० पैकी केवळ ८० खाटांद्वारे रुग्णसेवा दिली जात आहे. ओपीडी आणि केवळ दोन आंतररुग्ण वॉर्ड याठिकाणी आजघडीला सुरू आहेत.
मनपाची फक्त ओपीडी सेवा
महापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोग्य केंद्रांच्या ओपीडीत ४ लाख ३३ हजार २६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर आंतररुग्ण विभागात अवघ्या १ हजार २६८ रुग्णांवर उपचार झाले. यात प्रसूतींची संख्याही केवळ ३७० आहे. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात होणाºया प्रसूतीची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. अशा सगळ्यात मनपाच्या केंद्रांतूनही गंभीर रुग्णांसह छोट्या-छोट्या आजारांसाठी घाटीत रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे.
‘घाटी’ची कसरत
घाटीत गतवर्षी ओपीडीत ६ लाख ५१ हजार तर आयपीडीत ९८ हजार रुग्णांवर उपचार झाले. वर्षभरात १८ हजार प्रसूती झाल्या. एकूण ११७७ खाटा असताना १२०० ते १५०० रुग्ण दाखल होतात. त्यातून अनेकांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोयी-सुविधा अपुºया पडतात. रुग्णालयाला प्रतिजैविके, अॅन्टिरेबीज व्हॅक्सिन, मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरापासून एक सिटी स्कॅन बंद आहे. कॅ थलॅब बंद आहे. अनेक व्हेंटिलेटर बंद आहेत. वर्षभरात फक्त १० नवीन यंत्रे आली.
रुग्णांचा कल
चांगल्या दर्जाच्या सेवा ज्याठिकाणी मिळतात, त्याठिकाणी जाण्याकडे रुग्णांचा कल असतो. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हेल्थ वेलनेस क्लिनिकची संकल्पना सुरू केली आहे.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
अधिक चांगली सेवा
आरोग्य विभाग, महापालिकाची यंत्रणा सक्षम झाली तर घाटीत रेफर होण्याचे प्रमाण कमी होईल आणि टर्शरी केअर सेंटर म्हणून रुग्णालय अधिक नावारुपाला येईल. सुपर स्पेशालिटी विभाग, एमसीएच विंग, शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्ताराने रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळेल.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
सर्वांनी एकत्र काम करावे
आरोग्य सेवा मिळणे, हा सर्वांचा हक्क आहे. शासकीय आणि खाजगी सेवांनी नागरिकांना योग्य आणि वेळेत आरोग्य सेवा दिल्या पाहिजे. सर्वांनी आपापल्या स्तरावर आणि सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा दिली पाहिजे.
- डॉ. निता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा ------------