औरंगाबाद जिल्ह्यात शेतीतील मातीचे आरोग्य बिघडतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:33 PM2018-12-08T20:33:57+5:302018-12-08T20:34:29+5:30
शेतीचा डॉक्टर : मातीचा पोत खालावल्याचे तपासणीतून सिद्ध झाले.
- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)
निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. तसेच भरघोस आणि दर्जेदार पिकांच्या उत्पादनासाठी माती सुपीक असणे आवश्यक आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात नेमके उलटे घडत आहे. येथील शेतीतील मातीचे आरोग्य खालावल्याचे समोर आले आहे. रासायनिक खतांचा चुकीच्या पद्धतीने वापर व एकच पीक वारंवार घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हा परिणाम झाला आहे.
औरंगाबाद कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान जिल्हाभरातून आलेले मातीचे ६१ हजार ९९५ नमुने तपासण्यात आले. यात मातीतील आम्लविम्ल निर्देशांक (सामू), क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज व तांबे या १२ घटकांची तपासणी करण्यात आली. पीक वाढीसाठी चांगल्या जमिनीत ०.८० च्या वर सेंद्रिय कर्बचे प्रमाण आवश्यक आहे. यात कन्नड व औरंगाबाद तालुक्यातील काही गावांत ०.९० ते १ पेक्षा अधिक सेंद्रिय कर्बचे प्रमाण आढळून आले. तर वैजापूर व गंगापूरमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण ०.४० ते ०.६० आहे. शिवाय क्षारतेचे प्रमाण या दोन तालुक्यात जास्त आढळून आले. त्यामुळे येथील मातीचा पोत अन्य तालुक्यांपेक्षा जास्त खालावल्याचे तपासणीतून सिद्ध झाले.
सेंद्रिय खताचा वापर होतो तेथील मातीचा पोत सुधारत आहे. साधारण ७.५० ते ८.२० दरम्यान क्षाराचे प्रमाण हवे असते. ते वाढले आहे. सेंद्रिय कर्ब कमी असल्याने नत्रचे प्रमाण कमी आहे. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा अति व चुकीचा वापर टाळणे. तसेच सुपीक जमिनीसाठी गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक खते आदी सेंद्रिय घटकांच्या वापरातून सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. एकच पीक वारंवार घेणे टाळायला हवे.