आरोग्य यंत्रणा हादरली! एकाच दिवशी तिघांचा डेंग्यूने मृत्यूचा संशय, उपसंचालकांची गावात धाव
By संतोष हिरेमठ | Published: September 9, 2022 06:05 PM2022-09-09T18:05:23+5:302022-09-09T18:05:48+5:30
शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़.
औरंगाबाद : येथील तालुक्यातील शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डेंग्यू आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे़ दरम्यान, वैद्यकीय पथकाने गावात जाऊन पाहणी केली. त्यांचा मृत्यू डेंग्यूने झालेला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. या घटनेनंतर आज आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांनी आणि संपूर्ण आरोग्य पथकाने गावात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. उपसंचालक डॉ गोल्हाईत, जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. अभय धानोरकर, जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले आणि आरोग्य पथक शेवगा येथे दाखल झाली. यावेळी ग्रामस्थांना डेंग्यूविषयी माहिती दिली.
शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़. अशातच तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावामध्ये अफवांचे पेव फुटले. तिघांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याची चर्चा रंगली. ही बाब गंभीरतेने घेत आरोग्य गावात धाव घेऊन उपाययोजना केल्या.
त्यांचे मृत्यू इतर आजाराने
शेवगा गावातील तिघांचा बुधवारी मृत्यू झाला आहे़ वास्तविकता यात एका रुग्णाचा मृत्यू ह्दयविकाराने, दुसऱ्या रुग्णाचा न्यूमोनियाने मृत्यू झाला आहे़े. एकाचा अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगणे अशक्य आहे़.