काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात तीन दिवसांत १५ कोरोना रुग्ण, संशयितांच्या चाचण्या सुरु
By मुजीब देवणीकर | Published: March 15, 2023 01:11 PM2023-03-15T13:11:16+5:302023-03-15T13:12:27+5:30
सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : एच-३ एन-२ या काेरोनासदृश विषाणूने धुमाकूळ घातलेला असतानाच शहरात तीन दिवसांमध्ये तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून, उन्हाळ्यापूर्वी कोरोना उद्रेकाची ही चिन्हे तर नाहीत ना, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. मागील तीन वर्षांचा अनुभव पाहता मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक तीव्र होती.
सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील दोन केसेस या ग्रामीण भागातील असून १३ जण शहराच्या विविध भागांतील आहेत.
मेल्ट्रॉन रुग्णालय सज्ज
संसर्गवाढीचा धोका लक्षात घेत मेल्ट्रॉन रुग्णालयातील उपचार सुविधा सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम कामाला लावली जाणार आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोना, एच-३ एन-२ ची लक्षणे
कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्ल्यू या तिन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
घाटीत तपासणी
बाधितांसाठी एकच आरटीपीसीआर टेस्ट आहे. या टेस्टद्वारे घाटीतील लॅबमध्ये कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्ल्यू या आजारांची एकाच वेळी टेस्ट केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.