शहरातील विविध स्मशानभूमींत साचला राखेचा ढिगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:05 AM2021-05-21T04:05:12+5:302021-05-21T04:05:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी घेण्यासाठी त्याच्या जवळचे नातेवाईक येत नसल्याने शहरातील स्मशानभूमीत ८०पेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी घेण्यासाठी त्याच्या जवळचे नातेवाईक येत नसल्याने शहरातील स्मशानभूमीत ८०पेक्षा अधिक अस्थी विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत. तर मृतदेह जळाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या राखेचे ढिगारे स्मशानभूमीत साठले आहेत. काही स्मशानभूमीत ती राख खड्ड्यांत पुरली जात आहे.
संसर्ग होऊ नये म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर मनपाने नेमलेल्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पीपीई किट घालणाऱ्या नातेवाईकांनाच अग्नी देण्याची परवानगी दिली जात आहे. त्यातच अंत्यविधीला सोडाच पण मृतांची अस्थी व राख घेण्यासाठीसुद्धा नातेवाईक येत नसल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीपेक्षा आता परिस्थिती बदलत आहे. नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येऊ लागले आहेत. पण राख मात्र संसर्गाच्या भीतीने स्मशानभूमीतच सोडून जात आहेत तर काहीजण राखेने नदी दूषित होईल, म्हणून राख स्मशानभूमीतच ठेवत आहेत.
या संदर्भात शहरातील काही स्मशानभूमींत पाहणी केली असता, त्यात मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीच्या कोपऱ्यात राखेचा ढीग साठलेला दिसून आला. येथील स्मशानजोगी साहेबराव पवार यांनी सांगितले, की मृत व्यक्तीचे नातेवाईक राख नेण्यासाठी येत नसल्याने मागील वर्षभरापासून राख साठत आता ढिगारा जमा झाला आहे. यात सुमारे १००पेक्षा अधिक मृतदेहांची झालेली राख आहे. तर महिना उलटला तरी ५ जणांनी अजूनही अस्थी नेलेल्या नाहीत. त्या अजून आम्ही लॉकरमध्ये ठेवल्या आहेत.
एन ११ हडको येथील स्मशानभूमीतही राखेचा ढिगार दिसून आला. येथील स्मशानजोगी लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले की, मागील वर्षभरातील १५० मृतदेहांच्या अंत्यसंस्कारानंतर राखेचा ढिगारा साठला आहे. जवळपास ३० जणांच्या अस्थी त्यांच्या नातेवाईकांनी नेलेल्या नाहीत.
कैलासनगर स्मशानभूमीतील साहेबराव गायकवाड यांनी सांगितले की, मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता, आम्ही मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अस्थी व राख घेऊन जा, असे सांगतो. तरीही १००पेक्षा अधिक मृत व्यक्तींची राख जमा झाली होती. अखेर नाईलाजास्तव ती खड्ड्यांत पुरली. अजूनही पाचजणांच्या अस्थी नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले नाहीत. प्रतापनगर स्मशानभूमीतील भरत गायकवाड म्हणाले की, आता लोकांची मानसिकता बदलत आहे. आपल्या नातेवाईकांच्या अस्थी घेण्यासाठी लोक येत आहेत.
चौकट
गोदावरी दूषित होऊ नये म्हणून...
लोक आता नातेवाईकांच्या अस्थी घेण्यासाठी येत आहेत. मात्र, बाहेरगावातील कोरोनाबाधिताचे शहरात निधन झाले, तर त्याचे नातेवाईक अस्थी नेत नाहीत, अशा ५ ते ६ अस्थी सध्या लॉकरमध्ये आहेत. राख नदीत नेऊन टाकू नका, त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते, अशी आम्ही जनजागृती करत असल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. नातेवाईक अस्थी नेतात व राख स्मशानभूमीत सोडून जात असल्याने ढिगारा दिसून येत आहे.
गोविंद गायकवाड
स्मशानजोगी, पुष्पनगरी स्मशानभूमी
कॅप्शन
मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत साठलेला राखेचा ढिगारा.