हृदयरोग विभागाला सर्जन मिळेना
By Admin | Published: September 26, 2014 12:11 AM2014-09-26T00:11:17+5:302014-09-26T00:11:17+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) सर्जन एक वर्षापूर्वी राजीनामा देऊन निघून गेला.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) सर्जन एक वर्षापूर्वी राजीनामा देऊन निघून गेला. तेव्हापासून तेथील बायपाससह अन्य महत्त्वाच्या सर्जरी ठप्प झाल्या आहेत. या विभागाला सर्जन मिळावा, यासाठी घाटी प्रशासन पाठपुरावा करण्यात कमी पडले आहे. त्याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत असून, त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यांची दारे ठोठवावी लागत आहेत.
मराठवाड्यातील पहिला शासकीय हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग पाच वर्षांपूर्वी घाटीत सुरू झाला. तेथे अत्याधुनिक स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, आयसीयू, महिला आणि पुरुष रुग्णासाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. हृदयरोगतज्ज्ञ, प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफ आणि तंत्रज्ञांची स्वतंत्रे पदे मंजूर आहेत.
विभाग कार्यान्वित झाल्यामुळे तेथे रोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील हृदयरोग विभागात तज्ज्ञ कार्यरत असल्याने तेथे नियमित अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी केल्या जात आहेत. मात्र, अनेक रुग्ण असे असतात की, त्यांच्यावर बायपाससारख्या मोठ्या सर्जरी करण्याचा सल्ला दिला
जातो.
अशा रुग्णांसाठी घाटीतील सीव्हीटीएस विभागात सर्जरी होऊ शकतात. ही सर्जरी करण्यासाठी तेथे डॉक्टरच नाही. दोन वर्षांपूर्वी डॉ. महेश चौधरी हे सर्जन राजीनामा देऊन निघून गेले. त्यानंतर एक वर्षानंतर भरत सोनी नावाचे सर्जन घाटीत दाखल झाले होते. येथे रुजू झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना हव्या त्या सुविधा दिल्या. त्यांनीही सर्जरी करण्याचा धडाकाच सुरू केला. मात्र, अचानक राजीनामा देऊन ते निघून गेले. डॉ. सोनी गेल्यापासून तेथील सर्जरी ठप्प झाल्या. त्यांच्याऐवजी नवीन सर्जन मिळावा, यासाठी प्रशासन मात्र फारसे गंभीर नाही. परिणामी, एक वर्षानंतरही तेथील सर्जनचे पद रिक्त आहे. मानसेवी सर्जन डॉ. मनोहर काळबांडे यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुढे संलग्नता देण्यात आली नाही, त्याचाही फटका रुग्णसेवेला
बसला.