कोरोनाने ताटातूट केलेल्या मायलेकीचा व्हिडिओ कॉलवरून झाला हृदयस्पर्शी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:28 PM2020-05-06T18:28:02+5:302020-05-06T18:28:39+5:30
ताटातूट झालेल्या या मायलेकींचा व्हिडिओ कॉलिंगवरून परिचारिका व डॉक्टरांनी संवाद घडवून आणला.
औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुरा येथील २८ वर्षीय महिलेची शनिवारी मध्यरात्री नैसर्गिक प्रसूती झाली. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने चिमुकलीसह आईला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तीन दिवसांपासून चिमुकली वॉर्ड ५ मध्ये, तर आई पॉझिटिव्ह रुग्णांच्या वेगळ्या वॉर्डात भरती आहे. ताटातूट झालेल्या या मायलेकींचा व्हिडिओ कॉलिंगवरून परिचारिका व डॉक्टरांनी संवाद घडवून आणला.
स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा व मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या देखरेखीत महिलेवर उपचार सुरू असून, चिमुकलीकडे नवजात शिशू विभागाचे विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे हे लक्ष देत आहेत. चिमुकलीच्या घेतलेला स्वॅबचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह अहवाल आला. आई मानसिकदृष्ट्या सक्षम राहावी यासाठी हा संवाद घडवून आणल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
महिलेच्या सासरकडील मंडळी लॉकडाऊनमुळे येऊ शकत नसल्याने मुलीला सांभाळण्यासाठी महिलेच्या आई-वडिलांची टेस्ट महापालिकेकडून करून घेण्यात आली. त्यांचा अहवाल येताच चिमुकलीला आजीची माया मिळू शकेल. तोपर्यंत वॉर्डमधील परिचारिका व डॉ. सचिन बोधगिरे, डॉ. सुकेना सुचनेरवाला, डॉ. नीलेश हातझाडे तीची सुश्रूषा करीत आहेत. पॉझिटिव्ह महिलेच्या दुधातून संसर्ग होत नाही. मात्र, दूध देताना संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घाटी प्रशासनाकडून घेतली जात आहे. सध्या फार्म्युला फीड दिले जात असल्याचे डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.