थोडेसे दुर्लक्ष अन् ...! उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:54 PM2022-07-15T17:54:46+5:302022-07-15T18:14:35+5:30
हृदयद्रावक! नजर चुकवून चिमुकला पडला उकळत्या पाण्यात; ८ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी
सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील पालोद येथे लग्न झाल्यावर आलेल्या पाहुण्यांचा स्वयंपाक करताना तांदूळ शिजवून बाजूला ठेवलेल्या पातेल्यातील उकळत्या पाण्यात पडलेल्या १८ महिन्याच्या चिमुकल्याचा उपचार सुरू असताना आज सकाळी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. हसनेन कलीम पठाण असे मृत बालकाचे नाव आहे.
७ जुलै रोजी पठाण यांच्या घरी लग्न समारंभ होता. यासाठी पाहुण्यांचा स्वयंपाक सुरू होते. शिजलेले तांदूळ बाजूला काढून मोठ्या पातेल्यात उकळते पाणी तसेच ठेवण्यात आले होते. दरम्यान, अचानक नजर चुकवून हसनेन कलीम पठाण हा चिमुकला तेथे पोहचला आणि बघताबघता त्या पातेल्यात कोसळला. पाण्याच्या चटक्याने असह्य वेदना झाल्याने त्याने हंबरडा फोडला. त्याच्या आवाजाने आईवडील तेथे धावत आले. मात्र तोपर्यंत चिमुकला गंभीररित्या भाजला होता.
त्याच्यावर सुरुवातीला सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याची प्राण ज्योत मावळली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.