ती आई होती म्हणून, विद्युत तारेपासून पिलाला वाचवताना स्वत:ला केले मृत्यूच्या हवाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:01 PM2023-01-12T19:01:10+5:302023-01-12T19:02:39+5:30

नेवपूर येथील घटना : विजेचा जोरदार धक्का लागून मादी वानराचा मृत्यू

Heartbreaking! The monkey mother sacrificed herself to save the chick from the electric wire | ती आई होती म्हणून, विद्युत तारेपासून पिलाला वाचवताना स्वत:ला केले मृत्यूच्या हवाली

ती आई होती म्हणून, विद्युत तारेपासून पिलाला वाचवताना स्वत:ला केले मृत्यूच्या हवाली

googlenewsNext

चिंचोली लिंबाजी (औरंगाबाद) : विद्युत तारेला चिकटलेल्या आपल्या पिलाला वाचविण्यासाठी आई धावली. तिने स्वत:ला मृत्यूच्या हवाली करून पिलाला वाचविले. मृत्यूच्या दारात निपचित पडलेल्या आईला उठविण्याचा पिलू केविलवाणा प्रयत्न करीत होते. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले. ही घटना मंगळवारी सकाळी कन्नड तालुक्यातील नेवपूर येथे घडली.

मंगळवारी सकाळी नेवपूर येथील मारुती मंदिर परिसरात दहा - बारा वानरांचा वावर होता. यातील काही वानरे झाडावर तर काही घरांच्या छतावर वावरत होती. यावेळी खेळता खेळता या कळपातील एका मादी वानराचे छोटे पिल्लू महेंद्र देशमुख यांच्या घराला लागून असलेल्या विद्युत खांबावर चढले. विद्युत प्रवाह सुरू असल्याने ते पिल्लू तारेला चिकटले. ही बाब पिलाच्या आईच्या लक्षात आल्याने तिने आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला वाचविण्यासाठी खांबावर चढली व आपल्या चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून ओढून खाली फेकले. मात्र यावेळी तिला जोराचा शॉक लागल्याने ती जमिनीवर फेकली गेली. यात ती जागेवरच गतप्राण झाली. आपली आई निपचित पडल्याचे पाहून पिल्लू आईला कवटाळून आक्रोश करू लागले. या पिलाचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थांनाही गहिवरून आले. काही वेळानंतर या मुक्या प्राण्याला आपली आई गेल्याची जाणीव झाल्याने ते शांत बसून आईकडे एकटक पाहत होते. इतर वानरेही छतावर शांत बसून होती. मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात, हे या घटनेमुळे दिसून आले.

ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार
पिलाला वाचविताना मादी वानराचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ हळहळले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक नाना देशमुख, पंजाब देशमुख, अमोल देशमुख, अभिजित तायडे, रणजित देशमुख, अनिल देशमुख, निखिल देशमुख, उत्तम जगताप, हरिदास देशमुख आदींनी पुढाकार घेऊन मृत वानरावर विधिवत पूजन करून मारुती मंदिराच्या पाठीमागे खड्डा खोदून अंत्यसंस्कार केले.

Web Title: Heartbreaking! The monkey mother sacrificed herself to save the chick from the electric wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.