जिल्हाभरात उष्णतेची लाट कायम; दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य, बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 06:22 PM2019-04-30T18:22:24+5:302019-04-30T18:24:09+5:30
सूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम राहत आहे.
औरंगाबाद : उन्हाळ्यात दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होतात, असे चित्र पूर्वी फक्त विदर्भात दिसे. मात्र, यंदा एप्रिल महिन्यात विक्रमी तापमानाने शहरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि जिल्ह्यात सहा दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे.
शहरात सोमवारी (दि.२९) कमाल तापमान ४३.१, तर किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दोन दिवस ६१ वर्षांपूर्वीच्या विक्रमी तापमानाची बरोबरी केल्यानंतर सोमवारी तापमानात किंचित घट झाली. मात्र, तापदायक वातावरण अजूनही कायम आहे.
रणरणत्या उन्हामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी पाहायला मिळत आहे. शहरात सोमवारीदेखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळांमुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. जालना रोड, रेल्वेस्टेशन रोड, गुलमंडीसह विविध भागांत सायंकाळी ६ वाजेपर्यंत फारशी वर्दळ दिसून आली नाही. परिणामी, बाजारपेठेतही शुकशुकाट राहत आहे.
सायंकाळनंतरही प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पेय पिण्यासाठी गर्दी करतात. पंखे, कूलर खरेदीसाठीही गर्दी दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
उन्हाच्या तडाख्याने महिलेला भोवळ
उन्हाच्या तडाख्यामुळे एका महिलेला भोवळ आल्याची घटना सोमवारी हडको परिसरातील रस्त्यावर घडली. सदर महिला भोवळ येऊ न रस्त्यावर पडल्याचे दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पाणी देऊन महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. खाजगी रुग्णालयांत कमी-अधिक प्रमाणात सौम्य उष्माघाताचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
सूर्यास्तानंतरही गरम हवा
सूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम राहत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर वातावरणात गरम हवा राहत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. यामुळे शहरवासीय हैराण होत आहेत. वाहन चालविताना उन्हाच्या झळांनी दुचाकीचालक त्रस्त होऊन जात आहेत. डोक्याला रुमाल, त्यावर हेल्मट परिधान केल्यानंतरही उन्हाची झळ सहन करण्याची वेळ दुचाकीचालकांवर येत आहे.
शहरात असे राहिले तापमान
दिनांक तापमान
२४ एप्रिल ४१.६
२५ एप्रिल ४२.५
२६ एप्रिल ४३.०
२७ एप्रिल ४३.६
२८ एप्रिल ४३.६
२९ एप्रिल ४३.१