भारीच! ‘स्वच्छतारत्न बचत गटा’ला अमिताभ बच्चन यांची शाबासकी; आधुनिक स्वच्छतायंत्रे दिली भेट
By बापू सोळुंके | Updated: March 23, 2024 16:22 IST2024-03-23T16:22:16+5:302024-03-23T16:22:49+5:30
टापटीप राहणीतील हे सफाई कामगार आता आपले शहरही अधिक टापटीप ठेवत असल्यामुळेच त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल अभिनय सम्राट अमिताभ बच्चन यांनी घेतली.

भारीच! ‘स्वच्छतारत्न बचत गटा’ला अमिताभ बच्चन यांची शाबासकी; आधुनिक स्वच्छतायंत्रे दिली भेट
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपासून शहरातील काही वसाहतींमध्ये अत्यंत शिस्तबद्धपणे साफसफाईचे काम करणाऱ्या स्वच्छतारत्न बचत गटाने अल्पावधीत स्वत:ची उन्नती केली. महानगरपालिकेंतर्गत कार्यरत या स्वच्छतारत्न बचत गटाच्या कामाचे कौतुक सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले आहे. या बचत गटाला १० स्वच्छतायंत्रे भेट दिली आहेत.
उपजीविकेसाठी केले जाणारे कोणतेही काम कधीच छोटे अथवा मोठे नसते, तर ते काम प्रामाणिकपणे केल्यास त्याला प्रतिष्ठाच मिळते, हे या बचत गटाने दाखवून दिले. २०१५ मध्ये शहरातील वॉर्ड क्रमांक १०१, छोटा मुरलीधरनगर परिसरातील सफाई कामगार पुरुषांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा एकत्र आणले. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दीनदयाळ अंत्योदय योजने’च्या ‘राष्ट्रीय योजना नागरी उपजीविका अभियानांतर्गत दहा सफाई कामगारांचा स्वच्छतारत्न बचत गट’ स्थापन केला गेला. सुनील कपूरसिंग सिरसवाल बचत गटाचे अध्यक्ष बनले, तर सचिव म्हणून गुलाबसिंग हुकूमसिंग तुसामड यांची निवड करण्यात आली.
चिकलठाणा येथील बँकेत गटाचे संयुक्त खाते उघडण्यात आले. यानंतर ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानां’तर्गत गटाला ऑगस्ट २०२१ रोजी १० हजार रुपयांचे खेळते भांडवल देण्यात आले. सोबतच बँकेने या गटाला १० लाख रुपयांचे कर्जही दिले. यातून सफाई कामासाठी लागणारे वाहन आणि अन्य यंत्रसामग्री विकत घेतली. यामुळे त्यांचे काम सोपे आणि सुलभ होऊ लागले. त्यांच्यात कामाचा उत्साह वाढला आणि वेळही वाचू लागला.
अधिकाऱ्यांच्या मदतीने शहरातील ४० ते ५० सोसायट्यांच्या साफसफाईचे काम मिळवले. टापटीप राहणीतील हे सफाई कामगार आता आपले शहरही अधिक टापटीप ठेवत असल्यामुळेच त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल अभिनय सम्राट अमिताभ बच्चन यांनी घेतली. त्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. एवढेच नाही, तर त्यांच्या कामाने खुश होऊन अमिताभ बच्चन यांनी या बचत गटाला १० स्वच्छता यंत्रसामग्री वाहनांसह भेट दिली.
आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत व उपआयुक्त तथा विभागप्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता शहरातील विविध बचत गट आत्मनिर्भर होत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून शहराचा कायापालट होण्यास मोलाची मदत होत असल्याचे बोलले जात आहे.