Uddhav Thackeray: मोदी-शहांसह या ९ नेत्यांवर घणाघात, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची गर्जना
By महेश गलांडे | Published: April 2, 2023 09:21 PM2023-04-02T21:21:32+5:302023-04-02T21:23:00+5:30
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी या वज्रमुठ सभेतून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला. तर, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सत्ताकेंद्र काबिज केली जात आहेत, विरोधकांना अडचणीत आणलं जात आहे, असा सूर सर्वांनीच काढला. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९ जणांचा उल्लेख भाषणात केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर, गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले होते, तर तुम्ही सत्तेसाठी आता मिंध्यांचे काय चाटताय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी, भाजप-शिवसेना पक्षातील ९ जणांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनाही लक्ष्य केलं. नड्डा म्हणाले देशात एकच पक्ष राहिल, पण मी म्हणतो आधी शिवसेनेला संपवून दाखवा, मग बघू. पण, आम्ही भाजपला संपवू, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धवठ ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली. बाप चोरणारी टोळी म्हणत त्यांचा नोमोल्लेख केला. तर, शिंदे गटाचे मालेगावमधील आमदार सुहास कांदे यांचा नावाचा उल्लेख करत एक कांदा ५० खोक्यांना विकला गेल्याची टीका केली. यासह, चंद्रकांत पाटील यांच्याही नावाचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं की, आम्ही काळजावर दगड ठेऊन मिंध्यांना मुख्यमंत्री बनवतोय, असे ठाकरेंनी म्हटलं. तसेच, उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधील अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत, तर शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत नाव न घेता या दोन्ही नेत्यांवर टीका केली.
त्यासोबतच, मराठवाड्यातील जालन्याचे नेते असलेल्या राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंचं काम कोरोना काळात उल्लेखनीय राहिल्याचं त्यांनी म्हटलं. तेव्हा आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपेंनी चांगलं काम केलं, पण आत्ताचे आरोग्यमंत्री... असे म्हणत तानाजी सावंत यांचं नाव न घेता, त्यांच्यावरही निशाणा साधला. यावेळीस, उपस्थितांमधून खेकडा... खेकडा... असा प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वासह, देशातील लोकशाही, मोदी सरकारची हुकूमशाही, महाविकास आघाडी, शिंदे गट यांसह अनेक मुद्द्यावर भाष्य केले.