अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; गव्हासोबत शेतकऱ्यांचे स्वप्नही झाली जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:15 PM2023-03-08T12:15:00+5:302023-03-08T12:15:48+5:30
रात्रभर पाऊस असल्याने शेतकरी पिके पचविण्यासाठी काही करू शकले नाहीत.
- रऊफ शेख
फुलंब्री: तालुक्यात सोमवारी रात्री वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसाने शेकडो हेक्टर क्षेत्रातील गव्हू व हरबरा पिके आडवी झाली. या पिकांसोबत शेतकऱ्याचे स्वप्नही जमीनदोस्त झाले.
तालुक्यात यंदा रब्बीची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती गव्हू पिकाला दिली. यात एकूण ९ हजार ४ शे ४६ हेक्टर क्षेत्रात गव्हू पिकांची लागवड झालेली आहे. विहिरीला पाणी असल्याने यंदा भरपूर उत्पन्न निघेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी गव्हू पिकावर भरवसा ठेवला. यातूनच गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार हेक्टर क्षेत्राने गव्हाची अधिक लागवड झाली. मात्र, भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली. यामुळे उत्पन्नात याच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
फुलंब्री तालुक्यात सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होता. रात्रभर पाऊस असल्याने शेतकरी काही करू शकले नाही. पावसाने शेकडो हेक्टरमधील गव्हाचे पिक आडवे झाले. काढणीला आलेला गव्हू काळा पडण्याची शक्यता आहे. तसेच आंब्याचा झाडावरील मोहर गळून पडला आहे. हरभरा, कांदा, लसून पिकांवर देखील संक्रांत आली आहे. नुकसानीचे पंचनामा करून भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.