वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:44 PM2023-04-28T18:44:12+5:302023-04-28T18:44:40+5:30
अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंवार ओढवत आहे.
- श्रीकांत पोफळे
करमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात करमाड, दुधड, लाडसावंगी, पिंप्रीराजा, गोलटगाव, वरुडकाजी, चितेपिंपळगाव, शेकटा अशा जवळपास सर्वच मंडळातील बहुतांशी भागात आज सकाळी दहा वाजेनंतर अचानक वातावरणात काळोख पसरला व काही वेळानंतर लगेच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, आंबा अशा फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंवार ओढवत आहे. मागील काही वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक मोसंबी, आंबा यासोबत मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष अशा खर्चिक फळबागांच्या लागवडीकडे कल वाढवला. या फळांचा उत्पादन खर्च जास्त असला तरी यातून मोबदला देखील चांगल्या प्रमाणात मिळतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जात आहे.
दरम्यान, आज झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील तालुक्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळ गळती झाली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय उन्हाळी कांदा, ज्वारी या पिकांचे देखील नुकसान झाले आहे.
अद्याप हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे व रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. तोच शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने तडाखा दिला. महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ फळबागांच्या व उन्हाळी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.