मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी
By बापू सोळुंके | Published: July 12, 2024 08:01 PM2024-07-12T20:01:19+5:302024-07-12T20:01:43+5:30
सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी, जालना रोडवर आज वसंतराव नाईक चाैक ते क्रांती चौक रॅली
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या राजधानीचे शहरात शांततेत आणि शिस्तीचे रॅलीतून दर्शन घडविण्यासाठी आयोजक सज्ज झाले आहेत. जरांगे यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कमानीवर बॅनर आणि झेंडे लावण्यात आले आहेत.
सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे यांच्या या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता सिडकोतील वसंतराव नाईक चाैक ते क्रांती चौक अशी ही रॅली जाईल. रॅलीची जय्यत तयारी सकल मराठा समाजातील मान्यवरांनी केली. क्रांती चौकात भव्य स्टेज उभारण्याचे काम गुरुवारपासून सुरू झाले आहे. शुक्रवारी दिवसभर हे काम सुरू होते. यासोबतच जिजाऊ चौक (केम्ब्रिज चौक) ते नगर नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर, तसेच जळगाव रोडवर भगवे झेंडे लावण्याचे काम सुरू होते. यासोबतच मराठा क्रांती मोर्चामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी जरांगे यांच्या स्वागताचे विविध रस्त्यावर बॅनर लावल्याचे दिसत आहे.
दहा रुग्णालयांकडून मोफत आपत्कालीन सेवा
जरांगे यांच्या महाशांतता रॅलीदरम्यान सहभागी समाजबांधवांपैकी कोणाची प्रकृती अचानक खालावल्यास रॅली मार्गालगतच्या दहा रुग्णालयांमार्फत मोफत आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय संत तुकाराम मेडिकल फाऊंडेशनने घेतला. यासाठी रुग्णालयांची यादीही फाऊंडेशनने जाहीर केली आहे.
पोलीस आयुक्तांनी घेतली पुन्हा संयोजकांची बैठक
शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उद्याच्या महाशांतता रॅलीसंदर्भात सूचना केल्या.
सुमारे ५०० स्वयंसेवक सज्ज
१३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डीत मराठा समाजातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ऑगस्ट २०१६ रोजी काढण्यात आला होता. या घटनेला ८ वर्षे होत असताना शनिवारी जरांगे यांची महाशांतता रॅली होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज येणार आहे. शिस्तबद्ध रॅलीचे दर्शन घडविण्यासाठी समाजातील सुमारे ५०० स्वयंसेवक सज्ज आहेत.