शहरात पावसाची जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:03 AM2021-09-22T04:03:57+5:302021-09-22T04:03:57+5:30
औरंगाबाद : शहरात मंगळवारी दुपारी ४० कि.मी. प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी सुरू झालेला पाऊस ...
औरंगाबाद : शहरात मंगळवारी दुपारी ४० कि.मी. प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी सुरू झालेला पाऊस कधी जोरदार, तर कधी मध्यम स्वरूपात रात्री उशिरापर्यंत बरसत होता. चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७.६ मि.मी आणि एमजीएम वेधशाळेत रात्री ८ वाजेपर्यंत १८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
शहरात सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आलेले होते. सकाळी ११ वाजेनंतर अधूनमधून पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. चिकलठाणा, सिडको, हडको, गारखेडा, समर्थनगर, घाटी परिसर अशा सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. काही वेळेसाठी पावसाने चांगलाच जोर धरला. पावसाबरोबर जोरदार वारेही वाहत होते. छत्री, रेनकोटविना घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मिळेल त्या जागेत नागरिकांनी आडोसा घेतला. काही मिनिटांच्या पावसाने जालना रोडसह ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत कधी मध्यम, तर कधी रिमझिम पडत होता.