पावसाने उडाली त्रेधातिरपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:10 AM2017-10-11T00:10:40+5:302017-10-11T00:10:40+5:30
जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले आहे. बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले आहे. बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहू लागले आहेत. त्यातच मंगळवारी बीड शहरात तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्व रस्ते जलमय झाले होते. बीड नगर पालिकेतील वादामुळे नाल्यांची वेळच्यावेळी सफाई होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. त्यामुळे पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी दुपारीही पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर वरूणाराजाने उघडीप दिली. परंतु पुन्हा पहाटे रिमझीम पावसाला सुरूवात झाली.
दहा वाजेनंतर मात्र मुसळधार पावसाला बीडमध्ये सुरूवात झाली होती. तसेच परळी, अंबाजोगाई व गेवराईमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आष्टी, पाटोदा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे बिंदुसरा नदीला पुन्हा एकदा पूर आला होता. तसेच छोटी-मोठ्या नद्या, नाल्या, ओढेही खळखळून वाहू लागल्याचे चित्र दिसून येत होते.