जोरदार पावसाने मोठी विद्युत हानी
By Admin | Published: June 11, 2014 12:39 AM2014-06-11T00:39:52+5:302014-06-11T00:52:10+5:30
औरंगाबाद : हत्ती वाहनावरून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह शहरात पावसाने जोरदार सलामी दिली.
औरंगाबाद : हत्ती वाहनावरून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह शहरात पावसाने जोरदार सलामी दिली. शहरातील २२ ठिकाणची झाडे कोलमोडून पडली. १२ विद्युत खांबांनी रस्त्यावर लोटांगण घातले. झाडे पडल्याने ८ ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटल्या. सुदैव एवढेच की यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्युत खांब व वाहिन्यांमुळे शहरात सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्युतहानीमुळे सिडको एन-३, एन-४ तसेच एन-८, बालाजीनगर आदी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युतअभावी चिकलठाणा औद्योगिक वसाहतातील ‘ई’ सेक्टरमध्ये असलेल्या २५ लहान-मोठ्या कारखान्यांतील कामे रखडली होती.
सोमवारी ९ जून रोजी रात्री अचानक चोहूबाजूंनी ढग दाटून आले आणि ८.३० वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाचे टपोरे थेंब अंगाला सपासपा लागत होते. दुचाकीवाहनधारकांना याचा जोरदार फटका बसला. अवघ्या चार ते पाच मिनिटांत आनंदनगरी रिकामी झाली. जिथे आडोसा मिळेल तिथे लोक उभे राहिले होते. पावसापासून बचाव करण्यासाठी क्रांतीचौक उड्डाणपूल, सेव्हनहिल उड्डाणपूल, संग्रामनगर उड्डाणपुलाखाली अनेक वाहनधारक उभे होते.
जीटीएलने केलेल्या सर्व्हेनुसार शहरात २२ ठिकाणी झाडे पडली. त्यातील १२ झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळली. ठिकठिकाणच्या ८ विद्युत वाहिन्या तुटून खाली पडल्या. १८ ठिकाणचे विद्युत खांब पडले. त्यात काही खांब वाकले. सिडकोतील एलआयसी आॅफिस रोडवर तीन मोठी झाडे पडल्याने आज सकाळी या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. मनपाने त्वरित ही झाडे कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय सिडकोतील किटली गार्डन, हर्सूल टी-पाइंट, किलेअर्क, अदालत रोड आदी भागातही झाडे पडली. एलआयसी कार्यालयासमोरील तीन खांब, जालना रोडवर एक स्ट्रीट लाईट, शहाबाजार, हर्सूल टी-पॉइंट परिसरातील ३ खांब, सिडको एन-४ तसेच अन्य ठिकाणचे विद्युत खांब वाकले.
विद्युत पुरवठा खंडित
सिडको एन-३ व एन-४ परिसरातील विद्युत पुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला होता. या भागातील खांब वाकल्याने तेथील दुरुस्ती करण्यात आली व सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला. एमजीएमच्या आसपासचा परिसर, बालाजीनगर, एन-८ परिसर, एन-१ परिसरातील लाईट गुल झाली होती. येथेही सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही काही ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे ‘ई’ सेक्टरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. येथे इंजिनिअरिंग वर्कशॉप, केमिकल्स फॅक्टरी, प्रिंटिंग प्रेस आदी ३० युनिट आहेत. लाईट नसल्याने दिवसभर येथील काम बंद होते.