मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका; नुकसान भरपाईसाठी १६०० कोटींची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:22 PM2022-09-06T12:22:04+5:302022-09-06T12:22:35+5:30
मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जुलैमध्ये ५ लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये १ लाख ४० हजार ३३१.४४ असे ७ लाख २७ हजार ७९७.८५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्याला नुकसान भरपाईसाठी १ हजार ५९६ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी लागण्याचा प्रस्ताव ६ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तालय राज्य शासनाला सादर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे १० ऑगस्ट रोजी जाहीर केले. तसेच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाचाही मोबदला मिळण्याची घोषणा केल्यामुळे विभागाला जास्तीचा निधी लागणार आहे.
मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २३ जूननंतर दमदार पाऊस विभागात सुरू झाला. जुलैमध्ये नांदेड, हिंगोली, लातूर पाठोपाठ जालना आणि काही प्रमाणात बीड या पाच जिल्ह्यांत खरीप पिकाचे नुकसान होत शेतजमीन वाहून गेली. शासन किती रुपयांची मदत जाहीर करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप शासनाने काहीही मदत जाहीर केलेली नाही.