मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे: वरूण सरदेसाई
By योगेश पायघन | Published: September 19, 2022 04:36 PM2022-09-19T16:36:08+5:302022-09-19T16:37:19+5:30
युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांची कुलगुरूंकडे मागणी
औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात मराठवाड्यात अतिवृष्टींचे संकट असल्याने महाविद्यालय, विद्यापीठात शैक्षणिक शुल्क, परिक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क माफ करा, अशी मागणी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
मराठवाड्यात अतिवृष्टींचे संकट ओढवले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. त्यातच मराठवाडा विभागात परतीच्या पावसाने तडाखा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे उरलेसुरले खरीपचे पिकही हातचे गेले आहे.
या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थीही हतबल आणि निराश झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागवणे अवघड होऊन बसले आहे. आर्थिक चणचणीमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण सोडून गावी परत चालले असल्याचीही आमची माहिती आहे. गंभीर परिस्थितीत संकटग्रस्त विद्याथ्यांना दिलासा द्यावा, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ आणि पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे शैक्षणिक शुल्क, परिक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क माफ करा. अशी मागणी युवासेना सचिव सरदेसाई यांनी निवेदनात केली. यावेळी ऋषिकेश खैरे, तुकाराम सराफ, हनुमान शिंदे, नामदेव कचरे, संदीप लिंगायत आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.