अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्याला नुकसानभरपाईसाठी लागणार २,४०० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 08:07 PM2022-11-01T20:07:45+5:302022-11-01T20:08:06+5:30
यंदाच्या पावसाळ्यात ३० लाख हेक्टरवरील पिके गेली
औरंगाबाद : मराठवाड्याला जुलै, ऑगस्ट व त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टर, याच काळात सततच्या पावसाने ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टरचे आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे ७२ हजार ४९१ हेक्टरचे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १७ लाख ७० हजार ७४८ हेक्टर मिळून यंदाच्या पावसाळ्यात ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानभरपाईसाठी सुमारे २,४०० कोटी रुपये लागणार आहेत.
यंदा मराठवाड्यात ४८ हजार २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. मागील तीन वर्षांपासून खरीप हंगाम मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या हातून जातो आहे. यंदाही तशीच परिस्थिती ओढवली आहे.जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटी रुपयांची मदत शासनाने केली आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी २,४०० कोटींची मागणी विभागीय प्रशासनाने केली आहे.
किती शेतकऱ्यांचे नुकसान
मराठवाड्यात चार महिन्यांतील पावसामुळे २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत १७ लाख ३५ हजार ८२८ कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. ८ हजार ४७१ बागायती आणि २६ हजार ४४९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के नुकसान
औरंगाबाद : ६८ टक्के
जालना : ६३ टक्के
परभणी : ४३ टक्के
हिंगोली : ६४ टक्के
नांदेड : ७३ टक्के
बीड : ६४ टक्के
लातूर : ५५ टक्के
उस्मानाबाद : ६७ टक्के
एकूण : ६३ टक्के