मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा; साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:28 PM2022-07-19T20:28:56+5:302022-07-19T20:29:55+5:30
३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान ; पाच जिल्ह्यांतील पिकांना पावसाचा तडाखा
औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन ४१ दिवस झाले आहेत. या ४१ दिवसांत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पेरण्यानंतर बुड धरलेली ही पिके आगामी काळातील पावसात उभी राहतील की नाही, याबाबत शंका आहे. ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात (८ ते १८ जुलै) जोरदार पावसाने साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ५० हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली १५ हजार ९४४, नांदेड ३ लाख ३० हजार ८७९, तर लातूर जिल्ह्यातील १५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
४७६ हेक्टर जमीन गेली वाहून
जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे. फळपिकांचे ५८ हेक्टर, बागायत ५ हजार ४९९ हेक्टर, जिरायत ३ लाख ३२ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील १९ हजार १९७, नांदेडमधील ३ लाख ३० हजार ३५७, तर लातूरमधील १८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
१० जण गेले पुरात वाहून
मराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे विभागातील काही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. ४१ दिवसांतील पावसाळ्यात १० जण पुरात वाहून गेले आहेत. २४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. भिंत पडून एकजण दगावला आहे. दुभती जनावरे, पिकांचे नुकसान व मालमत्तांच्या पडझडी झाल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ७७९ कच्ची, तर तीन पक्की घरे पावसाने पडली आहे. २९८ लहान-मोठी दुधाळ जनावरे, तर १२० ओढकाम करणारी जनावरे दगावली आहेत. बीड जिल्ह्यातील एक, तर नांदेडमधील सात पुलांचे पावसामुळे नुकसान झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सात कि.मी.चे रस्ते वाहून गेले आहेत.
ओल्या दुष्काळाची चाहूल : ४०५ मि.मी. पाऊस
विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४०५ मि.मी. पाऊस झाला आहे. २४२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ५९ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ४० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर ओल्या दुष्काळाचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. आजवर झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाची चाहूल लागली आहे.