मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:34 PM2022-07-14T18:34:20+5:302022-07-14T18:36:42+5:30
१४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : जायकवाडी ते तेलंगणापर्यंतचे निम्न व नाशिक ते जायकवाडीपर्यंतचे ऊर्ध्व गोदावरी नदीचे पात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. निम्न गोदावरी पात्रात सरासरी १४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून यात जायकवाडी, श्रीरामसागर, श्रीपदा यल्लपल्ली प्रकल्प, लक्ष्मी बॅरेज, पीव्हीएन. राव कातनपल्ली प्रकल्पातील विसर्गाचा समावेश आहे. जायकवाडी धरणात ६.१ टीएमसी पाणी वाढले आहे; तर उर्वरित चार प्रकल्पांमध्ये १२८ टीएमसी पाण्याची सरासरी वाढ झाल्याचे निम्न गोदावरी विभाग, हैदराबादच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.
ऊर्ध्व गोदावरी पात्रातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नाशिक ते जायकवाडीपर्यंत प्रकल्पांमध्ये ५६ टक्के जलसाठा सध्या झाला असून, नाशिक पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १२३ पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला आहे. आजवर ३३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ऊर्ध्व गोदावरी पात्रातून एवढा विसर्ग
जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील २५ पैकी ९ धरणांतून १ लाख १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सगळे पाणी सध्या जायकवाडी येत आहे. धरणातील पाणीपातळी सध्या ५० टक्क्यांच्या आसपास गेली आहे. करंजवणमधून ११५५, वाघाड ११४७, पालखेड ९४३६, गंगापूर १० हजार, कादवा ३५१७, दारणा ८८४६, नांदुर मधमेश्वर ६५ हजार, पुणेगाव १३०६, तर आळंदी प्रकल्पातून २४३ क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे.
मराठवाड्यातील प्रकल्पांत ५० टक्के पाणी
मराठवाड्यातील ११ जलप्रकल्पांत सध्या ५० टक्के पाणी आले आहे. त्यात जायकवाडीत ५० टक्के, निम्न दुधना ६८, येलदरी ५८, सिद्धेश्वर १२ टक्के, माजलगाव ३४, मांजरा २९, पैनगंगा ५९, मानार ६२, निम्न तेरणा ५३, तर विष्णुपुरी जलप्रकल्पात ८४ आणि सिना कोळेगाव प्रकल्पात १७ टक्के पाणी आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे.