मराठवाड्यातील १६४ मंडळांत अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 07:13 AM2018-08-23T07:13:23+5:302018-08-23T07:14:11+5:30
मुसळधार पावसामुळे तीन जिल्ह्यांतील पिके धोक्यात
औरंगाबाद : मराठवाड्यातील १६४ मंडळांमध्ये १०० मि.मी.,पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याचे संकट उभे राहिले आहे. तीन जिल्ह्यांतील पिके अतिरिक्त पावसामुळे धोक्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. १६ आॅगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील खरीप हंगामातील पिकांचा नाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिंगोलीतील ३० पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या मंडळांतर्गत येणाऱ्या खरीप पिकांची शेती पाण्याखाली आली आहे. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी १३ मंडळांत पावसाने हाहाकार उडविला आहे, तर नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ५० मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विभागीय प्रशासनाने आदेश दिले आहेत.
औरंगाबादमधील ६५पैैकी १६ मंडळांत जालन्यातील ४९ पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाची अपेक्षा असून खरीप हंगामाच्या पिकांना त्याची गरज आहे. बीडमधील ६३ पैकी १७ मंडळांत अतिवृष्टी नोंदविली गेली आहे, तर लातूरमधील ५३ पैकी २२ आणि उस्मानाबादमधील ४२ पैकी ८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे ५ जिल्ह्यांत खरीप हंगामाला पावसाची गरज आहे. आजवर ५९ टक्के पावसाची नोंद मराठवाड्यात झाली आहे.
खरीप हंगामात ९ हजार कोटींची गुंतवणूक
मराठवाड्याचे खरीप पिकांखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्च सूत्रानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे.