सिल्लोड, जालना, माहुरात मुसळधार; हिंगोलीत सर्वदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:04 PM2019-07-03T15:04:44+5:302019-07-03T15:07:55+5:30

शेतीतील पेरण्यांना वेग येणार 

Heavy rain in Sillod, Jalna, Mahur; in Hingoli all over | सिल्लोड, जालना, माहुरात मुसळधार; हिंगोलीत सर्वदूर

सिल्लोड, जालना, माहुरात मुसळधार; हिंगोलीत सर्वदूर

googlenewsNext
ठळक मुद्देकुंडलिका नदीवरील दोन्ही बंधारे भरलेनांदेड जिल्ह्यात दमदार प्रतीक्षा

औरंगाबाद : जालना शहरासह माहूरमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर हिंगोली शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरू होती. 

जालना शहर व परिसरात मंगळवारी दुपारी अडीचनंतर पावसाला प्रारंभ झाला. मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. कुंडलिका नदीवर बांधलेले दोन्ही बंधारे भरून वाहिल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना आता वेग येणार आहे. 

जालना जिल्ह्यात २२ जून नंतर पावसाला प्रारंभ झाला होता. विशेष करून जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या भोकरदन तालुक्यातील पारध, दानापूर, जळगाव सपकाळ, हिसोडा परिसरात दमदार पाऊस झाला. यामुळे दानापूर येथील जुई धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला आहे. त्यामुळे भोकरदन शहरातील जवळपास ४० टॅकर बंद झाले आहेत. जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत १०४. ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या ८५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे.

माहूर शहरात मुसळधार पाऊस
नांदेड : जिल्ह्यात माहूर येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला़ तर किनवट तालुक्यातील मांडवीतही पावसाने दमदार हजेरी लावली़ नांदेड जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसून, मंगळवारी माहूरात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली़ जवळपास तासभर पाऊस बरसत होता़ तर किनवट तालुक्यातील मांडवीतही यावर्षीचा मोठा पाऊस आज झाला़ निवघाबाजार आणि नांदेड शहरात मात्र रिमझिम पाऊस सुरु होता़ 

पावसाने बळीराजा सुखावला
हिंगोली : हिंगोली शहरात दुपारी १२ वाजता हलक्या सरी बरसल्या. जवळपास अर्धातास पाऊस झाला. तर कनेरगाव नाका, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ, पोत्रा परिसरातही दमदार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील अडगाव रंजे, हट्टा, कौठा परिसरात रिमझिम पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातही रिमझिम पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यात सरी बरसल्या. तसेच सवना, बासंबा व कळमनुरी, नांदापूर या ठिकाणी पाऊस झाला. काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. 

सिल्लोड तालुक्यात पावसाने मोठे नुकसान : सिल्लोड तालुक्यात मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सिल्लोड शहर, शिवना, मादनी, वाघेरा, आमसरी, अजिंठा परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातही मुसळधार पाऊस झाला.

Web Title: Heavy rain in Sillod, Jalna, Mahur; in Hingoli all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.