जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:57 AM2017-08-21T00:57:59+5:302017-08-21T00:57:59+5:30
जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हवामान खात्याने मराठवाड्यात दिलेला पावसाचा इशारा अखेर खरा ठरला. जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिला. अन्वा, तीर्थपुरी, गोंदी या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भोकरदन, बदनापूर, घनसावंगी व अंबड तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. रविवारी सकाळी आठवाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७९.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
जालना शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. अधून-मधून विश्रांती घेत रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. सात ते आठ तास झालेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते. काही भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. अनेक भागातील वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दुपारी एकनंतर पावसाने उघाड दिली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तालुक्यातील जामवाडी, माळशेंद्रा, वंजारउमद्र, गोंदेगाव, पीरपिंपळगाव, घाणेवाडी, निधोना, इंदेवाडी, कारला, धारकल्याण, नंदापूर, कडवंची, रामनगर, नागेवाडी, गुंडेवाडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला. जालना तालुक्यात २२.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परतूर तालुक्यातही दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारी तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
अंबड तालुक्यात सर्वाधिक ५४. ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अंबड शहरातील नाले सफाईचे काम रखडल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.
मंठा, जाफराबाद, घनसावंगी, भोकरदन तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पोळा सणावरील दुष्काळाचे सावट काही अंशी कमी झाले.
अंबड : मोसमातील पहिल्याच दमदार पावसाने अंबड शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. शनिवारपासून संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरू आहे. रविवारीसुद्धा शहरात दमदार पाऊस झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले.
मान्सूनपूर्व नाले सफाईसाठी पालिकेच्या कडून वेगळा निधी उपलब्ध असतो. मात्र नगरपालिकेने नाले सफाई केली नाही. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या टिळकपथ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले.
दिवसभर टिळकपथ मार्गावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. नाल्यांची सफाई झाली नसल्याने नाल्यातील घाण व पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली होती. विशेष म्हणजे नवीन अंबडचे पावसाचे पाणी ज्या तलावात साचले जायचे तेथे काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने घाण पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेत येऊन साचू लागले आहे.याबाबत व्यापाºयांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र याविषयी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई पालिकेने केली नाही.यामुळे व्यापाºयात संताप आहे.
शहागड : दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहागड बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात येतात. मात्र, यावर्षी समाधानकारक पाऊस पडलाच नसल्याने बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. रविवरी झालेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत या बंधाºयातील पाणीपातळी कमी होती. मात्र, सायंकाळी सहानंतर गुळज (ता. गेवराई) बंधºयातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे शहागडसह परिसरातील नदीची पाणी पातळी अचानक वाढली. पाणी बंधाºयावरून वाहू लागले. बंधाºयाचे दरवाजे उघडले नसल्याने पाणी अडवले गेले. परिणामी गोदावरी नदीला लागून असलेल्या चाँद-सूरज नाल्यात पाणी साचल्याने शहागड-पैठण मार्ग बंद झाला. पैठण रोडवरील अंबड तालुक्यातील गोरी-गंधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव, आपेगाव या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार दत्तात्रेय भारस्कर, हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीच्या काठच्या गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.