मराठवाड्यात गारपिटीसह अतिवृष्टीचा इशारा; हाताशी आलेली पिके संकटात
By विकास राऊत | Published: October 7, 2022 07:48 PM2022-10-07T19:48:54+5:302022-10-07T19:49:29+5:30
ऐन सणासुदीच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याचे संकट उभे राहिले आहे.
औरंगाबाद : हवामान विभागाने मराठवाड्यासह पुढील तीन दिवस गारपिटीसह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांत गारपीट, विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, तर परभणी व हिंगोलीत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याचे संकट उभे राहिले आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टीतून वाचलेली पिके आता या परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहेत.
सोयाबीन, कापसाच्या नुकसानीची भीती
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची २४ लाख ८७ हजार ४८८ हेक्टरवर, कापसाची १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर पिके नऊ लाख ७१ हजार ४०३ हेक्टरवर पेरलेली आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाचा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.